ठाणे स्थानकात मल्टिलेव्हल पार्किंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

अडीच हजार वाहनांची क्षमता; रेल्वेला एक कोटी 56 लाखांचा महसूल 

मुंबई : महाराष्ट्रातील मोठा मल्टिलेव्हल वाहनतळ आता ठाणे रेल्वेस्थानकावर सुरू होणार आहे. त्या ठिकाणी 2500 हून अधिक वाहने उभी राहतील आणि रेल्वेला एक कोटी 56 लाख रुपयांचा महसूल मिळेल. रेल्वेस्थानकाजवळच पार्किंग उपलब्ध झाल्यामुळे गाडी कुठे उभी करायची, या चिंतेतून प्रवाशांची सुटका होणार आहे. 

उपनगरी रेल्वेसेवेचा विस्तार आणि स्थानकांवरील गर्दी वाढली आहे. अनेक प्रवासी आपली दुचाकी, कार घेऊन स्थानकापर्यंत येतात; परंतु अनेक स्थानकांबाहेर वाहनतळाची सोय नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. खासगी वाहनतळांवर अवाच्या सव्वा शुल्क घेतले जाते. 

हेही वाचा ः गुडघ्याला बाशिंग बांधून 'ते' म्हणतायेत, आशीर्वाद असू द्या!

मध्य रेल्वेने 2019 मध्ये 47 स्थानकांबाहेर वाहनतळ सुरू केले. त्यानंतर आता ठाणे स्थानकावर अत्याधुनिक मल्टिलेव्हल पार्किंग सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे ठाणे स्थानकाची निवड करण्यात आल्याचे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा ः 'मला कोरोना व्हायरसचा संसर्ग झालाय' सांगितल्यावर बलात्कारी गेला पळून..

या बहुस्तरीय वाहनतळावर 2500 पेक्षा जास्त वाहने उभी करता येतील. वाहनतळ चालवण्यासाठी खासगी कंत्राटदाराच्या नेमणुकीचा करार झाला आहे. मध्य रेल्वेला या मल्टिलेव्हल पार्किंगमधून वर्षाला एक कोटी 56 लाख रुपयांचा महसूल मिळेल, असे सांगण्यात आले. 

ठाणे स्थानकातील प्रवासी संख्या 
2015-16 : 2 लाख 36 हजार 
2016-17 : 2 लाख 47 हजार 
2017-18 : 2 लाख 58 हजार 
2018-19 : 2 लाख 62 हजार 

मध्य रेल्वेवर पहिल्यांदाच मल्टिलेव्हल वाहनतळ ठाणे स्थानकात उभारण्यात येणार आहे. या वाहनतळाचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणत फायदा होईल आणि मध्य रेल्वेला महसूल मिळेल. 
- शिवाजी सुतार,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Multilevel parking in Thane station