मुंबई : दर तासाला कोरोनामुळे 1 मृत्यू , मृत्यूदरात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

मुंबई : दर तासाला कोरोनामुळे 1 मृत्यू , मृत्यूदरात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या वर्षी जुलैमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता कोरोनामुळे मृत्यूच्या बाबतीत देशात चौथ्या क्रमांकावर आहे. मृत्यूदरात पंजाब राज्य पहिल्या क्रमांकावर, उत्तराखंड दुसऱ्या आणि नागालँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर असूनही महाराष्ट्राचा मृत्यू दर वाढला असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी राहिले आहे.

जुलैमध्ये मृत्यूदर 2.02 टक्के होता, तो आता 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबरपासून हा मृत्यूदर कायम आहे. गेल्या महिनाभरात राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी काढली तर राज्यात दर तासाला सरासरी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे, ही दिलासादायक बाब आहे.

मुंबईसह राज्यात आतापर्यंत 1,40,636 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत पहिल्या लाटेत एकूण 51,360 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेत म्हणजेच 10 फेब्रुवारी ते 16 नोव्हेंबरपर्यंत 89276 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या एका महिन्यात म्हणजेच 16 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबरपर्यंत 876 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: मुंबई : 29 ऑक्टोबर जागतिक पक्षाघात दिन

ही संख्या मोजली तर राज्यात दर तासाला एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोना मृत्यू निरीक्षण समितीचे  अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, राज्यात कोरोनामुळे मृत्यूंचा आलेख एप्रिलपासून वाढला असून जुलैमध्ये घटला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले असले तरी मृत्यूंच्या संख्येत वाढ झालेली नाही. या महिन्यात राज्यातील मृतांचा आकडा दोन अंकी राहिला आहे. त्यामुळे, दर तासाला कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट होत आहे.

राज्य कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले की, 2021 मध्ये आम्ही अनेक रुग्ण पाहिले आहेत ज्यांचा अचानक मृत्यू झाला. सायलेंट हायपोक्सिया म्हणजे ऑक्सिजनची पातळी इतकी घसरते की रुग्णाचा मृत्यू होतो. मात्र, आता कोरोनामुळे होणारे मृत्यू आटोक्यात येत आहेत. याचे कारण लसीकरण आणि लोकांची दक्षता आहे.

हेही वाचा: 39 टक्के रुग्णांचा मृत्यू ! मधुमेह, उच्च रक्तदाबासह कोविडही महत्वाचं कारण

मृत्यूंमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर -

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 12 टक्के मृत्यू मुंबईत झाले आहेत. तर, 14 टक्क्यांसह कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. ठाणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ठाण्याचा वाटा 8 टक्के आहे.

दर महिन्यात झालेले मृत्यू

महिना मृत्यू

एप्रिल - 14164

मे- 26531

जून- 26601

जुलै - 10,846

ऑगस्ट- 4522

सप्टेंबर - 1754

ऑक्टोबर - 1149

नोव्हेंबर 16 - 420

loading image
go to top