दहा दिवसानंतर मुंबईत विघ्नहर्त्याला भक्तीभावाने निरोप 

समीर सुर्वे
Tuesday, 1 September 2020

दुपारपर्यंत मुंबईत 1905 मुर्तींचे विसर्जन झाले आहे. कृत्रिम तलावात 823 मुर्ती विसर्जित करण्यात आल्या आहेत.

मुंबई, ता.1: कोविडच्या पार्श्वभुमीवर मुंबईतील गणेशभक्तांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. विघ्नहर्त्याला यंदा वाजत गाजत नव्हे तर भक्तीभावाने निरोप दिला जातोय. मुंबईतील अनेक प्रसिध्द मंडळांनी यंदा गणपती विसर्जन मंडपातच केले.

अनंत चतुर्दशीला मुंबईत होणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुका या जगभरातील आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र, यंदा कोविडच्या पार्श्वभुमीवर तब्बल 80 ते 90 वर्षांच्या परंपरेला यंदा छेद देण्यात आला. समुद्र किनारे, तलाव अशा नैसर्गिक विसर्जन स्थळावर महापालिकेने विसर्जनला मनाई केली. या सर्व ठिकाणी, महापालिकेच्या पथकाकडे मुर्तीदान केलं जातंय. यंदा महानगर पालिकेचं पथक मुर्तींचं विसर्जन करणार आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक विसर्जन स्थळे किंवा कृत्रिम तलावात लांबूूून विसर्जनाला येऊ नका असंही आवाहन महापालिकेने केले होते. त्यानुसार अनेक गणेशोत्सव मंडळानी मंडपातच कृत्रिम तलाव तयार करुन मुर्तीचे विसर्जन केले.

महत्त्वाची बातमी - पालघरमध्ये टोसिलीझुमॅब औषधाचा काळाबाजार उघडकीस; उपचाराच्या नावाखाली रुग्णांची पिळवणूक

आज दुपारपर्यंत मुंबईत 1905 मुर्तींचे विसर्जन झाले आहे. कृत्रिम तलावात 823 मुर्ती विसर्जित करण्यात आल्या आहेत.

अनंत चतुर्दशीला दरवर्षी गिरणगावपासून थेट गिरगाव चौपाटीपर्यंत दुतर्फात भाविकांची गर्दी असते. गिरगाव चौपाचीवर पाऊल ठेवायलाही जागा नसते. विसर्जनाचा सोहळा 26 - 27 तास न थांबता सुरु असतो.

महत्त्वाची बातमी - खासगी रूग्णालयांवरील सरकारचे नियंत्रण संपूष्टात? सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव रखडला

मुंबईत गणेशोत्सावात अनेक परंपरा सुरु झाल्या आहेत. लालबाग येथील गणेश गल्लीतील गणपतीची मिरवणुक सुरु झाल्यांनत गिरणगावातील इतर सार्वजनिक मंडळांची मिरवणुक सुरु होते. मुंबईचा राजा म्हणून प्रसिध्द असलेल्या गणेश गल्लीतील विघ्नहर्तांचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन झाल्यानंतर इतर मंडळांच्या गणेश मुर्तीचे विसर्जन होते. मात्र, यंदा गणेश गल्लीचा मुर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात होणार आहे.

( संकलन - सुमित बागुल )

mumbai ganesh immersion news 2020 during corona virus and lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai ganesh immersion news 2020 during corona virus and lockdown