वयोवृध्द पुरूषांमध्ये हिवाळ्यात प्रोस्टेटचा आजार असण्याची शक्यता जास्त

वयोवृध्द पुरूषांमध्ये हिवाळ्यात प्रोस्टेटचा आजार असण्याची शक्यता जास्त

मुंबई: वयोवृध्द पुरूषांमध्ये हिवाळ्यात वारंवार मूत्रविसर्जन होणे म्हणजे प्रोस्टेटचा आजार असण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. बेनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लाशिया (बीपीएच) अर्थात प्रोस्टेट ग्रंथीच्या आकारमानात होणारी वाढ ही हिवाळ्याच्या काळात वयस्कर पुरुषांमध्ये आढळणारी एक सामान्य अवस्था आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून प्रोस्टेट वाढण्याच्या रूग्णांमध्ये 30 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
 
60 वर्षांवरील पुरुषांना अधिक जाणवते ही समस्या

यावर योग्य पद्धतीने केल्या जाणाऱ्या उपचारांमुळे मात करता येऊ शकते. रात्री द्रवपदार्थांचे सेवन कमी करणे, जीवनशैलीतील बदल आणि औषधे घेऊन यावर नियंत्रण मिळवता येते. वयोवृध्द (60 वर्षांवरील) पुरुषांना सर्वाधिक जाणवणाऱ्या समस्यांपैकी एक म्हणजे प्रोस्टेटच्या आकारमानातील वाढ होय. वीर्यस्खलनाच्या वेळी शुक्राणूंचे वहन करणारा स्राव प्रोस्टेट ग्रंथी निर्माण करते. या ग्रंथी मूत्रनलिकेच्या बाजूला असतात. मूत्रनलिकेद्वारे मूत्र शरीराबाहेर टाकले जाते. जेव्हा एखाद्याला बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लाशियाचा (बीपीएच) त्रास होतो, तेव्हा त्या व्यक्तीची प्रोस्टेट ग्रंथी सामान्य आकारमानाहून मोठी झालेली आहे. त्यामुळे मूत्रनलिका पिळल्यासारखी होते आणि परिणामी मूत्राचा प्रवाह कमकुवत होतो आणि रात्री लघवीची भावना होऊन सतत झोपेतून जाग येत राहते.

ही आहेत या आजाराची लक्षणे

लघवीला सतत जावे लागणे किंवा घाईने जावे लागणे, रात्रीच्या वेळी लघवी लागणे आणि मूत्राशय पूर्णपणे रिकामे न करता येणे आदी ही लक्षणे जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे मत अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. सूरज लुणावत यांनी मांडले आहे. दुर्देवाने हवामान थंड झाले की लघवीसंदर्भातील लक्षणे अधिक तीव्र होतात आणि हिवाळ्यात प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याचे प्रमाणही वाढते.

घामाचे प्रमाण कमी होणे ही एक मुख्य कारण

हिवाळ्यात प्रोस्टेट वाढण्याच्या प्रमाणात वाढ होण्याचे कारण म्हणजे या दिवसांत आपल्याला घाम कमी येतो आणि घामावाटे आपल्या शरीरातील द्रवपदार्थ बाहेर टाकले जाण्याचे प्रमाण कमी होते. या प्रक्रियेत मूत्राची निर्मिती अधिक प्रमाणात होते. त्यामुळे, हिवाळ्यात आपल्याला अधिक वेळा लघवीला जावे लागते. एरवी ही समस्या फारशी गंभीर नाही पण त्यावर वेळीच उपाय झाला नाही, तर त्याचा एखाद्याच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. ही समस्या जीवनशैलीतील थोडेफार बदल, औषधे किंवा अगदी शेवटला पर्याय म्हणजे ट्रान्सयुथरल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट (टीयूआरपी) ही शस्त्रक्रिया यांच्या मदतीने हाताळली जाते. तेव्हा सोनोग्राफी करवून घेऊन स्वत:ला तपासून घ्या आणि कोणते उपचार अनुकूल आहेत हे ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉ. सूरज लुणावत, युरोलॉजिस्ट, अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालय


तणाव कमी करणे हा उपचार महत्त्वाचा

लघवी करताना मूत्राशय पूर्णपणे रिकामे होईल याची काळजी घ्या, कारण, त्यामुळे सतत लघवीला जाण्याची गरज कमी होईल. पुरुष चिंतेत किंवा तणावाखाली असतात, तेव्हा त्यांना वारंवार लघवीची भावना होते. तेव्हा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहून तसेच ध्यानधारणेसारख्या तणावमुक्तीच्या उपाययोजना करून तणाव कमी करा. संध्याकाळनंतर द्रवपदार्थांचे सेवन टाळा. रात्री कॅफिनयुक्त पेये किंवा मद्य घेणे टाळा, कारण, त्यामुळे मूत्राशयात दाह निर्माण होऊ शकतो आणि मूत्रपिंडे अधिक मूत्रनिर्मितीसाठी उत्तेजित होऊ शकतात, परिणामी रात्रीच्या वेळी लघवीची भावना वाढू शकते. ओटीपोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी व्यायाम करा. त्याचप्रमाणे हिवाळ्यात थंड हवामानामुळे वारंवार लघवीला जावे लावे लागत असल्याने गरम कपडे घालून स्वत:ला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com