मुंबई : अपूर्ण बांधकाम केलेल्या इमारती एसआरएने मारल्या एमएमआरडीएच्या माथी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : अपूर्ण बांधकाम केलेल्या इमारती एसआरएने मारल्या एमएमआरडीएच्या माथी

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) खंडर आणि अपूर्ण बांधकाम झालेल्या इमारती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माथी मारल्या आहेत. अपूर्णावस्थेत इमारतींचे काम पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएला तब्बल 45 कोटी 35 लाख 13 हजार 819 रुपयांचा खर्च येणार आहे. या काम यासाठी एमएमआरडीएने पात्र कंत्राटदारांकडून निविदा मागविल्या आहेत.

कुर्ला पूर्व येथील बंटर भवन येथे एका खाजगी विकासकाने रहिवाशी इमारती उभारल्या आहेत. या इमारती एसआरएने प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी एमएमआरडीएकडे हस्तांतरित केल्या आहेत. येथे चार इमारती असून त्या इमारती अपूर्ण अवस्थेतील आहेत. इमारती अपूर्ण कॉलम, अपूर्ण स्लॅब, रस्ते, पाणी अशी पायाभूत अनेक कामे विकासकाने अपूर्ण ठेवलेली आहेत. त्यामुळे या इमारती खंडर झालेल्या अवस्थेत आहेत. एमएमआरडीएमार्फत मेट्रोचे विविध प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन येथील इमारतींमध्ये करण्यात येणार आहे.

हेही वाचा: "रोहितपेक्षाही 'हा' खेळाडू कर्णधारपदासाठी योग्य"; इंग्लंडच्या स्पिनरचं मत

प्रकल्पबाधितांचे योग्य पुनर्वसन व्हावे आणि मेट्रो प्रकल्प वेळेत मार्गी लागावेत यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने अपूर्ण अवस्थेतील इमारतींची कामे पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार घरांची दुरुस्ती आणि शिल्लक कामे यासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. या कामांसाठी 45 कोटी 35 लाख 13 हजार 819 रुपयांचा आर्थिक भुर्दंड एमएमआरडीए प्रशासनाला सोसावा लागणार आहे.

पीडब्ल्यूडी, महापालिका, म्हाडा, सिडको या संस्थांमध्ये नोंदणी असलेले आणि बांधकामे केल्याचा अनुभव असणाऱ्या संस्थांना या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तसेच निविदा प्रकियेत निवड होणाऱ्या कंत्राटदारास सहा महिन्यात शिल्लक कामे पुर्ण करावी लागणार आहे.

loading image
go to top