Mumbai Local Train | आजपासून सर्वसामान्यांना मर्यादित मुभा; विनामास्क, फुकट्यांवर होणार कारवाई

Mumbai Local Train | आजपासून सर्वसामान्यांना मर्यादित मुभा; विनामास्क, फुकट्यांवर होणार कारवाई


मुंबई  : गेल्या दहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना उद्यापासून (ता. 1) मर्यादित लोकल प्रवासास मुभा मिळाली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा ठराविक वेळेत सुरू होत आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल यांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. दरम्यान, विनातिकीट प्रवास करणाऱ्या, विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

राज्य सरकारने गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे सर्व प्रवाशांना पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 पासून ते दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्य प्रवासी या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी लोकलमधून प्रवास करू शकणार नसल्याचे निर्देश राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. 

गर्दीचे नियोजन आणि गर्दीचे विभाजन तत्काळ होण्यासाठी बंद केलेली सर्व प्रवेशद्वारे, जिने, सरकते जिने, पादचारी पूल खुले केले जाणार आहेत. एटीव्हीएम, जेव्हीटीएम, सर्व तिकीट खिडक्‍या सुरू करण्यात येणार आहेत. सीएसएमटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, चर्चगेट, वांद्रे, अंधेरी, जोगेश्‍वरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या स्थानकांवर गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. लोकलमध्ये, रेल्वे स्थानकात, रेल्वे परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा व्यवस्थेकडून महापालिकेशी समन्वय साधण्यात आला आहे. लोकलमध्ये अचानक प्रवाशांची तिकीट तपासणी केली जाणार आहे. 

तिकीट तपासनीसांची पथके 
गर्दी नसलेल्या वेळी सर्वसामान्यांना प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे; मात्र गर्दीच्या वेळी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वसामान्यांनी प्रवास केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तिकीट तपासनीसांची पथके तैनात आहेत. सीएसएमटीवर 80, दादर 40, कुर्ला 30, घाटकोपर स्थानकावर 15 तिकीट तपासनीस तैनात आहेत. मध्य रेल्वेच्या स्थानकावर एकूण 700 तिकीट तपासनीस असणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

सीएसएमटी स्थानकावर रंगीत तालीम 
सर्वसामान्यांसाठी उद्यापासून (ता. 1) ठराविक वेळेत लोकल सेवा सुरू होत आहे. दिल्लीतील इस्राईल दूतावासासमोर झालेल्या बॉम्बस्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट असून, सर्वत्र अनेक संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. सीएसएमटी रेल्वेस्थानकावरही रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि अधिकारी तैनात असून, रंगीत तालीमही घेण्यात आली. यामध्ये आरपीएफ, जीआरपी, स्थानिक पोलिस, एनएसजी कमांडो यांनी भाग घेतला. मागील दोन दिवस रात्री 10 ते रविवारी मध्यरात्री 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत रंगीत तालीम सुरू होती. 25 एनएसजी कमांडोंच्या दोन तुकड्यांनी सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 18 वर सहभाग घेतला. 

गर्दीचे नियोजन आणि विभाजन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा विभागाने कंबर कसली आहे. सर्व उपाययोजना केल्या आहेत. सर्व प्रवेशद्वार, जिने, पादचारी पूल, एटीव्हीएम खुली केली आहेत. विनामास्क आणि विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. 
- जितेंद्र श्रीवास्तव,
विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे 

Mumbai Local Train Limited access to the general public from today

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com