Mumbai : मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा?

मराठी भाषा विभागांमध्ये काही निवृत्त झालेल्या आणि पदावर येऊन बसलेल्या अधिकाऱ्यांकडून मराठी विश्वकोश मंडळाच्या विविध प्रशासकीय
raja Dixit
raja Dixitsakal

मुंबई : मराठी व भाषा विभागातील अंतर्गत राजकारण आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी करण्यात येत आलेल्या अडवणुकीला कंटाळून मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर विभागाकडून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सूत्राकडून देण्यात आली.

मराठी भाषा विभागांमध्ये काही निवृत्त झालेल्या आणि पदावर येऊन बसलेल्या अधिकाऱ्यांकडून मराठी विश्वकोश मंडळाच्या विविध प्रशासकीय कामकाजाची अडवणूक केली जात आहे. अनेक प्रकारचे निर्णय अडवून ठेवले जात असून त्यासाठी मंडळाला टार्गेट करत असल्याने त्याविषयीची खदखद निर्माण झाली होती.

त्यात ज्ञान मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अनेक प्रकारच्या अनागोंदीवर विद्यमान अध्यक्ष दीक्षित यांनी लगाम लावला होता. तो राग ठेवून मंडळाची वेळोवेळी कोंडी होईल, यावर भर दिला जात होता. यासर्व कुरापतीमुळे डॉ. दीक्षित यांनी आपला राजीनामा दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या विश्व मराठी संमेलनाला मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित आणि साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे या दोघांनाही जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. परिणामी या विश्व मराठी संमेलनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत हे दोन्ही अध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

त्यांच्या या गैरहजेरीबद्दल मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांच्याकडेही चुकीची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे या संमेलनात मंडळाचे अध्यक्ष वगळून इतर अधिकारी व्यासपीठावर दिसत होते. तर हे अध्यक्ष इतर कारणामुळे संमेलनाला येऊ शकले नाहीत असा मेसेजच यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच मंत्र्यांना दिल्याचेही सांगण्यात येते.

विश्वकोश मंडळासह साहित्य संस्कृती मंडळाचीही प्रशासनस्तरावर वेळोवेळी अडवणूक सुरूच आहे. त्यात भाषा विकास मंत्री दीपक केसरकर हे दोन्हीही मंडळाच्या कामकाजावर खुश असले तरी त्यांच्याकडून दिले जाणारे मेसेज अध्यक्षापर्यंत जाणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात असल्याचेही अनेक प्रकारही समोर आले होते.

नुकतेच मंत्र्यांनी या अध्यक्षांना बोलावले असताना त्यांना तो निरोप जाणीवपूर्वक उशिरा देण्यात आला होता. अशा अनेक कारनाम्यामुळे दोन्ही मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात खदखद पसरली असून त्याचाच परिणाम म्हणून मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात डॉ दीक्षित यांच्याशी अनेकदा संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

दरम्यान, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे हेही मराठी भाषा विभागाच्या प्रशासकीय कामकाजावर नाराज असले तरी त्यांनी मात्र, आपला राजीनामा देण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही सांगण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com