गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप देशपांडेंनी व्हिडिओद्वारे मांडली बाजू|MNS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Action on Sandeep Deshpande

गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप देशपांडेंनी व्हिडिओद्वारे मांडली बाजू

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या विरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल संदीप देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिला कॉन्टेबलला धक्का लागल्याचे वृत्त देशपांडे यांनी फेटाळून लावले असून, आपण पळून गेलेलो नसून वकिलांचा सल्ला घेत असल्याचे एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे. (Sandip Deshpande News)

दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे. यामध्ये त्यांनी महिला पोलिसाला धक्का लागला नसल्याचा दावा केला आहे. तसेच स्पर्शदेखील झाला नसल्याचे त्यांनी म्हटले असून, आमचा कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. ही सर्व घटना राज ठाकरेंच्या सीसीटीव्हीत चित्रित झाला असेल. दरम्यान, आपण पळून गेलेलो नसल्याचे त्यांनी यावेळी पोलिसांनी सांगितले आहे. माझ्या घरी बायको आणि सहा वर्षांचा मुलगा असतात, इतरांच्या घरी जातात तसे पोलीस रात्री बेरात्री बारा वाजता तिथे जातील. मी घरी नाहीय, मी वकीलांचा सल्ला घेत असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आज मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवास्थानी भेट घेतली. त्यावेळी धुरी आणि देशपांडे यांना ड्युटीवर असलेल्या महिला कॉन्स्टेबलने देशपांडे आणि धुरी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धुरी यांनी महिला पोलीस कॉन्स्टेबलला धक्का देत तेथून पळ काढला. तर देशपांडेही पोलिसांना चकवा देत पळाले होते.

त्यानंतर आता सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल संदीप देशपांडे यांच्या विरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांना धक्काही लागला नसल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी व्हिडिओ जारी करत केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

संदीप देशपांडे, संतोष साळी आणि संतोष धुरी शिवतीर्थावर (Shivteertha) दाखल झाले होते. यानंतर माध्यमांना प्रतिक्रया देत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला मनसे नेते संतोष धुरी (Santosh Dhuri) आणि संदीप देशपांडेंना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धुरी यांनी महिला कॉन्स्टेबलला धक्का दिला, त्यामुळे त्या जमिनीवर पडल्या. त्यानंतर आता या घटनेबाबत संदीप देशपांडे यांनी व्हिडिओ जारी करत पोलीस कॉनस्टेबलला धक्कादेखील लागला नसल्याचे म्हटले आहे.