Big Breaking: सचिन वाझेपाठोपाठ आणखी एक अधिकारी पोलिस सेवेतून बडतर्फ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सचिन वाझेपाठोपाठ आणखी एक अधिकारी पोलिस सेवेतून बडतर्फ

सचिन वाझेपाठोपाठ आणखी एक अधिकारी पोलिस सेवेतून बडतर्फ

मुंबई: अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण (Ambani Explosive Case) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील (Mansukh Hiren Murder Case) मुख्य आरोपी सचिन वाझे (Sachin Waze) याला काही दिवसांपूर्वी पोलिस सेवेतून बडतर्फ (Dismiss) करण्यात आले होते. त्यानंतर आता त्याला या दोन्ही प्रकरणात मदत करणारा पोलिस अधिकारी रियाझ काझी (Riyaz Kazi) याच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर असताना रियाझ हिसामुद्दीन काझी याला मनसुख हत्या प्रकरणात NIA ने अटक (Arrest) केली होती. त्यानंतर सचिन वाझेप्रमाणेच काझीलाही आज पोलिस सेवेतून कमी करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिस दलाची मोठी बदनामी झाली असून पदाचा दुरूपयोग केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. (Mumbai Police Officer Riyaz Kazi Dismissed form Police Service after Sachin Waze in Mansukh Murder Case)

हेही वाचा: Sachin Waze Case: पोलिस अधिकारी रियाझ काझी निलंबित

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी सर्वप्रथम सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर NIAने पोलीस अधिकारी रियाझ काझीला अनेकदा चौकशीसाठी बोलावलं. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जाणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तशातच स्फोटकांच्या कटात सामील असणे आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणे या आरोपांखाली रियाज काझीला अटक करण्यात आली.

हेही वाचा: अँटेलियाजवळ स्कॉर्पिओ ठेवताना कुठे होता सचिन वाझे, NIAला मिळाली मोठी माहिती

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या कटामध्ये रियाझ काझीही सामील होता, अशी शंका NIA ला सुरूवातीपासूनच होती. म्हणूनच सचिन वाझेला ताब्यात घेतल्यानंतर काही दिवसांतच रियाझ काझीला चौकशीसाठी बोलवलं गेलं. त्याची वारंवार चौकशी करण्यात आली. CIU चे प्रमुखपद वाझेकडे होते आणि रियाझ हादेखील CIUचा अधिकारी असल्याने त्याच्यावर NIAला संशय होता. अखेर त्याला अटक करण्यात आले. अटकेनंतर त्याला सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं. मात्र आज त्याला पोलिस सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आलं.

हेही वाचा: Mansukh Hiren Case: मनसुख हिरेनला फोन करून घोडबंदरला बोलवणारा 'तावडे' सापडला?

कोण आहे रियाझ काझी?

API रियाझुद्दीन काझी 102 बॅचचे पोलीस अधिकारी आहे. 2010 मध्ये त्याने MPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्याची पोलीस भरती झाली. त्याचे पहिले पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये PSI च्या पोस्टवर झालं होतं. तेथे त्याने प्रोबेशन पीरियडवर काम केलं. वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये काही वर्षे काम केल्यावर त्यांची 'अँटी चेन-स्नॅचिंग स्कॉड'मध्ये बदली करण्यात आली. त्यानंतर रियाझुद्दीन याची थेट CIU मध्ये बदली झाली. अँटिलिया स्फोटक प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा संशय बळावताच त्याची बदली LA मध्ये करण्यात आली होती. अखेर ११ एप्रिलला रिजाझला पुरावे नष्ट करणे, तसेच गुन्हा घडत असल्याची माहिती असतानाही त्यात सहभागी होण्याच्या आरोपाखाली NIAने अटक केली.

(संपादन- विराज भागवत)

loading image
go to top