16 वर्षं मोबाईल वाट पाहताहेत मालकाची... अखेर होणार लिलाव! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांकडून चोरीला गेलेले तब्बल 120 मोबाईल 16 वर्षे पोलिसांकडे पडून आहेत. पोलिस आता त्यांचा लिलाव करणार आहेत. 

मुंबई : मुंबईच्या खचाखच भरलेल्या लोकलमधून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. कित्येकदा ते लोकलमध्ये बॅग किंवा इतर मौल्यवान वस्तू विसरतात. अनेकांचे मोबाईल चोरीला जातात. काही जण रेल्वे पोलिसांत त्याची तक्रारही करतात, पण त्याचे पुढे काय झाले याची दखल घेत नाही. तुम्हाला सांगितले तर खरे नाही वाटणार, पण पश्‍चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवरील गुन्ह्यांत 16 वर्षांपासून अडकून पडलेले तब्बल 120 मोबाईल आपल्या मालकाची वाट पाहत आहेत. अंधेरी स्थानकात तेव्हाचे सर्वाधिक सेलेबल ठरलेले मोबाईला धूळ खात पडून आहेत. त्यांच्यावर हक्क सांगायला कोणीच आले नसल्याने रेल्वे पोलिसांनी त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचायलाच हवं : सोनम कपूरला लंडनमध्ये का वाटली भीती?

विशेष म्हणजे मोबाईल लिलावात घेण्यासाठी बेस प्राईस अवघी 50 रुपये आहे. 50 रुपयांपासून मोबाईल उपलब्ध असतील, परंतु ते चालू आहेत की बंद याची खात्री खरेदीदाराला करावी लागणार आहे. 

महत्त्वाचे : टीम इंडियाच्या वयस्कर चाहत्या चारुलता यांचे निधन

लोकलमध्ये प्रवाशांनी हरवलेल्या वस्तूंची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली जाते. त्यानंतर रेल्वे पोलिस लोकलमधील साहित्याचा शोध घेऊन ते प्रवाशांना परत करतात. 

वांद्रे लोहमार्ग विभागाचे सहायक पोलिस आयुक्‍तांच्या आदेशावरून अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांतील निकाल लागलेल्या वस्तू पडून आहेत. पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालाचे हक्‍कदार किंवा वारसदार न आल्याने गेल्या 16 वर्षांपासून 120 मोबाईल तसेच आहेत. आश्‍चर्य म्हणजे त्यातील काही मोबाईल चालू स्थितीत आहेत. त्यात काही नवीन मोबाईल अर्थात स्मार्टफोनही आहेत. मात्रा आता त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. 

हे वाचलं का? : प्रदूषणाने बेजार, पाताळगंगा नदीची व्यथा

25 जानेवारीला सकाळी 11 वाजता अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात लिलावातील मोबाईल घेण्यासाठी इच्छुकांना जावे लागेल. मात्र, त्यांनी आधार कार्ड आणि पॅन कार्डाच्या छायांकित प्रतीसह हजर राहावे, असे आवाहन अंधेरी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भारत चौधरी यांनी केले आहे. 

उरलेले मोबाईल भंगारात 
चोरीचा मोबाईल लिलावात मिळवण्याची संधी असली तरी तो चालू आहे की नाही, याची खातरजमा खरेदीदारांनाच करावी लागणार आहे. आहे त्या परिस्थितीत मोबाईल विकण्यात येणार आहेत. मोबाईल विक्रीतून येणारी रक्कम रेल्वेच्या तिजोरीत जमा होणार आहे. विकले न गेलेले मोबाईल भंगारात काढण्यात येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai railway police will be auctioned stolen mobile after 16 years