esakal | प्रदूषणाने बेजार, पाताळगंगा नदीची व्‍यथा
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोली : पाताळगंगा नदीत नाल्यातून सोडले जात असलेले सांडपाणी.

खोपोली नगरपालिका क्षेत्र व खालापूर तालुक्‍यातील शेकडो गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि औद्योगिक क्षेत्रेही पाताळगंगा नदीवर अवलंबून आहेत; परंतु तालुक्‍याची भाग्यरेषा असलेली पाताळगंगा नदी जलप्रदूषणामुळे बेजार झाली आहे.

प्रदूषणाने बेजार, पाताळगंगा नदीची व्‍यथा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खोपोली : खोपोली नगरपालिका क्षेत्र व खालापूर तालुक्‍यातील शेकडो गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि औद्योगिक क्षेत्रेही पाताळगंगा नदीवर अवलंबून आहेत; परंतु तालुक्‍याची भाग्यरेषा असलेली पाताळगंगा नदी जलप्रदूषणामुळे बेजार झाली आहे. जलप्रदूषण सतत वाढत असल्याने पाणीपुरवठा योजना धोक्‍यात येत असून, नागरिकांचा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

पाताळगंगा नदीच्या प्रदूषणाला खोपोली नगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप केला जातो. शहरातील भुयारी गटार योजना रखडल्याने लाखो लिटर सांडपाणी गटारे व नाल्यांमधून थेट नदीत सोडले जात आहे. त्याचप्रमाणे औद्योगिकपट्ट्यातील लहान-मोठ्या उद्योगांतूनही प्रदूषित सांडपाणी पाताळगंगा नदीत सोडले जाते. रासायनिक सांडपाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे नदीतील मासे मरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. 

अबब... उल्‍हासनगरमध्‍ये सैराट... भाऊजीला घातल्‍या गोळ्या

नदीतील पाण्याला दुर्गंधी येऊ लागल्यावर स्थानिक नागरिक आक्रमक होतात आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करत असतात. स्थानिक प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ या तक्रारींची दखल घेऊन पाहणी दौरा करतात, पाण्याचे नमुने घेतात. पाहणी आणि पाण्याच्या तपासणीनंतर संबंधित कंपनी किंवा आस्थापनांवर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन देऊन विषय तात्पुरता मिटवतात. हे चक्र वर्षानुवर्षे सुरू असल्यामुळे पाताळगंगा नदीचे प्रदूषण वाढतच आहे. 

दरम्यान, पाताळगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी खोपोली शहरातून निघणारे सांडपाणी शास्त्रीय प्रक्रिया करून उद्याने आणि झाडांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे, असे खोपोलीच्या नगराध्यक्ष सुमन औसरमल यांनी सांगितले. नगरपालिकेतर्फे सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारण्याबाबत पाठपुरावा केला जात असून, त्यासाठी आवश्‍यक तांत्रिक मदत करण्याची रायगड प्रदूषण नियंत्रण मंडळाची तयारी आहे, असे उपप्रादेशिक अधिकारी सचिन आडकर म्हणाले.

अरे बापरे असे कसे ... कर्जतमध्‍ये कृषिपंप चोर बिनबोभाट

सांडपाणी एकत्र करण्यासाठी भुयारी गटार योजनेला जलसंधारण व संबंधित खात्यांकडून मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी खोपोली नगरपालिका स्वच्छता अभियानांतर्गत १० टक्के निधी खर्च करणार आहे. भुयारी गटारे, नदीची स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आदी कामे येत्या आर्थिक वर्षात प्राथमिकतेने करण्यात येतील.
- सुमन औसरमल, नगराध्यक्ष, खोपोली

पाताळगंगा नदीतील पाण्याचे नमुने घेऊन प्रदूषणाच्या स्तराची तपासणी नियमितपणे होते. कंपन्यांमधील रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणेची सतत तपासणी केली जाते. नदीत प्रदूषित सांडपाणी सोडल्याचे स्पष्ट झाल्यावर त्वरित कडक कारवाई केली जाते. प्रदूषण रोखण्यासाठी लवकरच यंत्रणा निर्माण होईल.
- सचिन आडकर, उपप्रादेशिक अधिकारी, रायगड प्रदूषण नियंत्रण मंडळ

loading image
go to top