esakal | Mumbai: ‘पाहुण्यां’च्या मुक्कामाला मर्यादा असतात : शरद पवारांची ‘एनसीबी’वर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

 शरद पवार
‘पाहुण्यां’च्या मुक्कामाला मर्यादा असतात : शरद पवारांची ‘एनसीबी’वर टीका

‘पाहुण्यां’च्या मुक्कामाला मर्यादा असतात : शरद पवारांची ‘एनसीबी’वर टीका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘लखीमपूरच्या हत्याकांडाला मी जालियनवाला बाग सदृश घटना असे म्हणालो. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्राप्तिकर विभागाने अजित पवार, त्यांच्या बहिणींच्या घरासह संबधितांवर छापे टाकले. केंद्रीय तपास यंत्रणाचे अधिकारी हे ‘पाहुणे’ म्हणून येणार याची कल्पना होती. पण पाहुण्यांनी किती दिवस घरात मुक्काम करावा याला काही मर्यादा असते,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लगावला. राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाईवर हल्लाबोल केला.

शरद पवार म्हणाले की, ‘‘जिथे छापे पडले त्याची चौकशी दिवसभरात होणे शक्य आहे. पण हे अधिकारी सहा दिवस झाले तरी घरातून बाहेर पडत नाहीत. दिल्लीतून आदेश येईपर्यंत घरातून बाहेर पडायचे नाही, असे काही अधिकाऱ्यांकडूनच समजते. म्हणून हे सरकारी पाहुणे सहा दिवसांपासून मुक्काम ठोकून आहेत. इतक्या दिवस पाहुण्यांनी पाहुणचार घेणे कितीपत योग्य आहे? सीबीआय, ईडी, एनसीबी, प्राप्तिकरसारख्या संस्थाचा केंद्र सरकार गैरवापर करत आहे.

हेही वाचा: जालना : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

राजकीय हेतूने वापर सुरू आहे. अनिल देशमुखांबद्दल तत्कालीन पोलिस आयुक्तांनी आरोप केले. त्यामुळे देशमुखांनी राजीनामा दिला. पण ज्या जबाबदार अधिकाऱ्याने आरोप केले ते कुठे आहे ?’’ अनिल देशमुखांच्या घरावर पाच वेळा ‘सीबीआय’ने छापा टाकला. हे कितीपत योग्य आहे, याचा विचार जनतेने करायला हवा, असेही पवार म्हणाले.

अधिकाऱ्यांवर टीका

‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईबाबत शरद पवारांनी गंभीर चिंता व्यक्त केली. वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी काही मते मांडली, त्यावर भाजपचे नेते खुलासा करायला समोर येतात. याचाच अर्थ एनसीबी आणि भाजपचे संगनमत असून केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत आहे हे सिद्ध होते, असे पवार यांनी स्पष्ट केले. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या छाप्यामधे पंच म्हणून गोसावी नावाची व्यक्ती ‘एनसीबी’ने समोर केली. पण सध्या हाच पंच फरार आहे. अशा संशयास्पद व्यक्तीची पंच म्हणून निवड होते, यावरूनच या अधिकाऱ्यांचे लागेबांधे कोणासोबत आहेत, हे सिद्ध होते, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा: मुंबई : पदोन्नतीमधील आरक्षणासाठी शपथपत्र; चर्चेनंतर निर्णय

देवेंद्र फडणवीसांचे ‘अभिनंदन’

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते म्हणून त्यांचे अभिनंदन,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली. ‘फडणवीस एकदा मुख्यमंत्री झाले होते, पण आता विरोधी पक्षनेता असूनही त्यांना मुख्यमंत्रिपदाचा विसर पडत नाही, याचा आनंद आहे. पण ही कमतरता आमच्यात आहे. कारण मी चार वेळा मुख्यमंत्री होतो ते मला आठवतही नाही,’ असा मार्मिक टोला शरद पवार यांनी लगावला. दरम्यान,‘मी विरोधीपक्षनेताही होतो. विरोधात काम करणे अधिक सुखावह असते,’ असे म्हणत त्यांनी फडणवीस यांना टोमणा मारला.

loading image
go to top