मुंबई : गर्भवती महिलांच्या लसीकरणाला धीमा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबई : गर्भवती महिलांच्या लसीकरणाला धीमा प्रतिसाद

मुंबई : मुंबईत प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांसाठी लसीकरण मोहिम मुंबई महापालिकेच्या वतीने राबवली जात आहे. जवळपास सर्वच वयोगटातील आणि श्रेणीतील नागरिकांचा किमान एक डोस लक्ष्य पूर्ण करण्यात पालिकेला यश आले आहे. पण, गर्भवती महिलांच्या लसीकरणात मात्र पालिका अजूनही पिछाडीवर आहे. कारण, जुलै पासून नोव्हेंबरपर्यंत पालिकेने जवळपास 3, 322 गर्भवती महिलांचे लसीकरण केले आहे.

गर्भवतींचे लसीकरण सुरू होऊन पाच महिने पूर्ण झाले आहेत. तरीही लसीकरणाला धीमा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे. मुंबईत आत्तापर्यंत केवळ 3,322 महिलांनी लस घेतली आहे. यात पहिला डोस 1985 आणि 1337 जणींचा दुसरा डोस झाला आहे.

गर्भवती महिलांना कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत विशेष धोका नसल्याचे जाणवले असले तरी दुसऱ्या लाटेत मात्र त्यांना तीव्र लक्षणे आढळली आहेत. पहिल्या लाटेत गर्भवती महिलांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी होते पण, त्यातून होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण तुलनेने कमी होते. पण, दुसऱ्या लाटेत दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले पण, मृत्यूंची संख्या वाढली. तर, जवळपास 10 ते 15 टक्के महिलांना तीव्र लक्षणे होती. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी लसीकरण उपलब्ध करण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने गर्भवती महिलांच्या लसीकरणाला परवानगी दिली असली तरी करोनाचा संसर्ग झाल्यास संभाव्य धोके आणि प्रसुतीच्या काळात लसीकरणाचे माहीत नसलेले दुष्परिणाम याची माहिती दिल्यावर लस घेण्याचा निर्णय गर्भवतीचा असेल असे स्पष्ट केले आहे.  लस घेण्याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण असून लसीकरणाबाबत अनेक शंकाकुशंका या महिलांमध्ये आहेत. त्यामुळे लसीकरणाला अजून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

हेही वाचा: बेळगाव : ईएसआय रुग्णालयाचे ‘सर्व्हर डाऊन’; अजून पाच दिवस येणार अडचणी

प्रमुख वैद्यकीय रुग्णालये, प्रसूतीगृह आणि काही उपनगरीय रुग्णालयात लसीकरण केले जाईल. प्रसूतीगृहातील ओपीडीत जाणार्‍या गर्भवतींचे समुपदेशन केले जात आहे. शिवाय, लसीकरण केंद्रांवरही त्यांना लसीकरणाविषयीची माहिती दिली जाईल. त्यानंतर, त्यांचे लसीकरण केले जाईल. गर्भवती महिलांना लस देताना कर्मचार्‍यांना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी प्रशिक्षण दिले गेले आहे.

मुंबईत पालिकेने 15 जुलैपासून 35 रुग्णालयांत गर्भवती महिलांसाठी लसीकरण सुरू केले आहे. याला आता पाच महिने उलटले तरी पालिकेत आत्तापर्यंत केवळ 3322  गर्भवती महिलांनी लस घेतली आहे. शहरात सुमारे दीड लाख महिला या गर्भवती असून त्या लसीकरणासाठी पात्र आहेत. खासगी रुग्णालयातही गर्भवती महिलांच्या लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, पालिकेच्या आकडेवारीनुसार, सध्या दुसरा डोस घेण्याकडे गर्भवती महिलांचा जास्त कल दिसतो. दररोज होणाऱ्या नोंदीमध्ये 22 नोव्हेंबर या दिवशी दुसरा डोस 24 तर पहिला डोस फक्त 6 महिलांनी घेतला. असे एकूण फ्कत 30 गर्भवतींचे लसीकरण केले गेले.

हेही वाचा: वयाच्या 30 व्या वर्षात महिलांनी 'या' 5 सप्लीमेंट्स घ्याव्यात

इतर वयोगट आणि श्रेणीतील नागरिकांच्या तुलनेत गर्भवतींच्या लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतील अनेक केंद्रांवर आलेल्या महिलांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृतीचे प्रयत्न केले जात असून सविस्तर माहिती देण्यासाठी फलकही लावले गेले आहेत. शिवाय, आमच्या आरोग्य सेविकाही त्यांना मार्गदर्शन करतात.

डॉ. शीला जगताप, मुंबई जिल्हा लसीकरण अधिकारी

loading image
go to top