esakal | मुंबई : पदपथांवर आसरा अन् कर्करोगाशी झुंज
sakal

बोलून बातमी शोधा

cancer

मुंबई : पदपथांवर आसरा अन् कर्करोगाशी झुंज

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा आघात, त्यावरील अवाढव्य खर्च आणि सरकारची अनास्था यामुळे परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आजही पदपथांवर आसरा शोधावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये कमी झालेली पदपथांवरील रुग्ण व नातेवाईकांची संख्या पुन्हा वाढली आहे.

सध्या या पदपथांवर ३०० ते ३५० रुग्ण व त्यांचे नातेवाईक आसऱ्याला आहेत. प्लास्टिकचा कागद किंवा चटई अंथरून तिथेच त्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यात तरुण, वयोवृद्ध रुग्णांसह महिला व लहान मुलांचादेखील समावेश आहे. उपचार सुरू असल्याने कुठल्याही सोई-सुविधांशिवाय त्यांना पदपथांवर दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे त्यांना गंभीर आजारासह स्थानिकांच्या विरोधाचाही सामना करावा लागत आहे.

हेही वाचा: कांदिवली : स्कायवॉकवर भिकाऱ्यांचा अड्डा

पाकिस्तान, नेपाळमधूनही रुग्ण

परळच्या टाटा कर्करोग रुग्णालयात देशभरातून रुग्ण येत असतात. उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता, झारखंडमधून सर्वाधिक रुग्ण येतात. एवढेच नव्हे तर बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तानमधील गरीब रुग्णदेखील टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. कर्करोगाच्या चाचण्या व उपचार सलग चार ते सहा महिने सुरू असल्याने रुग्णांना मुंबईत थांबावे लागते.

धर्मशाळांची वानवा

मुंबईत धर्मशाळांची वानवा आहे. ज्या आहेत तिथे जागा मिळत नाही. आसपास लॉजिंग व हॉटेल आहेत; मात्र गरीब व गरजू रुग्णांना खर्च करणे परवडत नाही. त्यामुळे या रहिवाशांना पदपथांचा आसरा शोधावा लागतो. उघड्यावर पदपथावर राहणाऱ्या या रुग्णांना अनेकदा राहिवाशांचा रोष पत्करावा लागतो. अनेकांना महानगरपालिकेच्या कारवाईचा सामनादेखील करावा लागतो. महापालिकेच्या कारवाईनंतर काही दिवस पदपथ जरी मोकळे होत असले, तरी यांची समस्या मात्र सुटत नाही.

टाटा रुग्णालय घरांच्या प्रतीक्षेत

कर्करोग रुग्ण आणि नातेवाईकांच्या निवासस्थानाची व्यवस्था करण्यासाठी गृहनिर्माण विभागाने भोईवाडा येथील बॉम्बे डाईंग मिलच्या जमिनीवर उभारलेल्या संक्रमण शिबिरातील १०० घरे देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र या संक्रमण शिबिराला अद्यापही भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे ही घरे म्हाडाने अद्यापही टाटा रुग्णालयाच्या ताब्यात दिलेली नाहीत. टाटा रुग्णालय घरांच्या प्रतीक्षेत असून म्हाडा प्रशासन ओसी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

स्थानिकांचा विरोध

सरकारने म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रुग्णालयाला हस्तांतरित केल्या होत्या. खासदार शरद पवार यांच्या हस्ते टाटा मेमोरियल रुग्णालयाला सदनिकांच्या चाव्याही सुपूर्द करण्यात आल्या होत्या; मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घरे देण्याचा निर्णय रद्द केला.

हेही वाचा: आयटी धोरणासाठी संकल्पना द्या : राज्यमंत्री सतेज पाटील

रोशन बीबी (वय ४५)

पश्चिम बंगालमधील रोशन बीबी या ब्रेस्ट कॅन्सरने पीडित आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांनाही निवाऱ्यासाठी पदपथाचाच आसरा आहे. काही सामाजिक संस्थांनी प्लास्टिक कागद दिल्याने त्याचेच त्यांनी डोक्यावर छत बनवले आहे. त्यांनी सुरुवातीला रोज ४०० रुपये भाडे भरून खोली घेतली होती. सहा महिने त्या खोलीत काढले; मात्र उपचार आणि भाड्यापोटी त्यांचे जवळपास तीन लाख रुपये खर्च झाल्याने त्या पदपथावरच राहत असल्याचे त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक मिजानूर मिया यांनी सांगितले.

रामावती देवी (वय ५५)

बिहार येथील छपरा जिल्ह्यातील रामावती यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे. दोन महिन्यांपूर्वी त्या उपचारांसाठी मुंबईत आल्या. उपचारांसाठी त्यांना दीड महिना थांबावे लागणार आहे. त्यांची तब्येत खराब असल्याने मुलगा, सुनेला त्यांनी बोलावून घेतले आहे. दोन महिन्यांत ५० हजार रुपये खर्च झाला आहे. काही दिवस त्याही कुटुंबासह १६० रुपये भाडे देऊन एका खोलीत राहिल्या; मात्र पैसे खर्च झाल्याने शिवाय उपचारांसाठी पैसे लागणार असल्याने त्यांनी पदपथावर राहणे सुरू केल्याचे त्यांचा मुलगा मुकेश आणि सून प्रियांका देवी यांनी सांगितले.

देवडा बीबी (वय ४९)

पश्चिम बंगाल येथील देवडा बीबी गेल्या सहा महिन्यांपासून टाटा रुग्णालयासमोरील पदपथावर आहेत. सोबत मुलगा जहीर अली त्यांची काळजी घेत आहे. देवडा बीबीचे चार केमो झाले असून त्यांना अजून चार केमोथेरपी घ्यायच्या आहेत. त्यानंतर डॉक्टरांनी रेडिएशनदेखील सुचवले आहे. सुरुवातीला त्या दोन महिने रूम भाड्याने घेऊन राहिल्या. दिवसाला ५०० रुपये भाडे त्यांनी भरले. नंतर जवळचे पैसे संपल्यानंतर त्यांना नाइलाजास्तव पदपथाचा आसरा घ्यावा लागला. आतापर्यंत अडीच लाख रुपये खर्च झाला आहे.

जमशेद मंडल (वय ४८)

पश्चिम बंगाल येथील जमशेद आठ महिन्यांपासून पदपथावर राहत आहेत. त्यांना हाडांचा कॅन्सर आहे. त्यांच्यावर सर्जरी झाली असून आतापर्यंत दोन लाख रुपये खर्च झाला आहे. सध्या खर्चाला जवळ फुटकी कवडी नाही. त्यामुळे पदपथाचा आसरा घेतला आहे. पदपथावर त्यांनी प्लास्टिक कागदाची शेड बांधली आहे; मात्र पावसाने जोर धरल्यास भिजत आणि थंडीत कुडकुडत त्यांना दिवस काढावे लागत आहेत. यावर सरकारने काही तरी राहण्याची व्यवस्था करावी अशी विनंती त्यांची पत्नी जैनब बीबी यांनी केली.

loading image
go to top