esakal | मुंबईत १३ ते ३५ वयोगटाला कोरोनाची सर्वाधिक बाधा

बोलून बातमी शोधा

corona-mm 2.jpg

पाहा आकडेवारी काय दाखवते?

मुंबईत १३ ते ३५ वयोगटाला कोरोनाची सर्वाधिक बाधा

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोनाचा फास आणखी घट्ट झाला असून मुंबईतील तरुण मंडळी त्याच्या विळख्यात येत आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार सध्या 13 ते 35 वयोगटातील तरुण सर्वाधिक संसर्गित होत आहेत. दरम्यान, पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत 68 हजारांहून अधिक तरुण बाधित आहेत. 

वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग तरुणवर्गाला सर्वाधिक होत आहे. मात्र वर्षभरानंतर ही त्यांना होणारी लागण कमी झालेली नाही. 13 ते 35  या वयोगटातील तरुणांना लागण होत असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. शिवाय उपचारासाठी येणाऱ्या रूग्ण संख्येत  ही वाढ होत असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले. 
 

तीन महिन्यात 25 टक्के रुग्ण 
2020 च्या मार्चच्या शेवटापासून कोरोनाचे रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून डिसेंबर 2020 पर्यंत 13 ते 35 या वयोगटातील 810 तरुणांवर उपचार केले गेले. तर, 2021 च्या जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंत 203 तरुण रुग्णांवर उपचार केले गेले. म्हणजेच फक्त तीन महिन्यात यंदा 25 टक्के रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या आकडेवारीनुसार कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये पसरत आहे. 

दादर, कुर्ला टर्मिनसवर गर्दी रोखण्यासाठी रेल्वेकडून काटेकोर नियोजन

33 टक्के रुग्ण मुंबई महानगर प्रदेशातील  
33 टक्के रुग्ण हे मुंबई महानगर प्रदेशातील केईएम रुग्णालयात दाखल होत आहेत. मुंबई बाहेरील येणाऱ्या रुग्णांची अवस्था अत्यंत बिकट असल्याने उपचार करताना प्रयत्नांची शिकस्त करावी लागते. त्यामुळे, अशा रुग्णांनी त्या त्या ठिकाणाजवळील कोविड सेंटर मध्ये दाखल होऊन उपचार केल्यास वेळेत उपचार मिळू शकतात. केईएम रुग्णालयातील बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के आहे. मात्र मुंबई बाहेरून येणाऱ्या रुग्ण औटघटकेला आल्या कारणाने त्यांच्यावर अधिक मेहनत घ्यावी लागते. 

दिलासादायक! मुंबईत आज नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त 

सध्या दाखल होणारे बरेचसे रुग्ण शरीरातील प्राणवायू कमी होत असल्याने दाखल होत आहेत. शिवाय ते उशिरा येत आहेत. गेल्या वर्षी 36 ते 56 मधील वयोगट जेवढ्या प्रमाणात प्रभावित दिसून आला ते प्रमाण या वर्षी 13 ते 35 वयोगटात दिसून येत आहे. हे धोकादायक वळण आहे. 

-डॉ. हेमंत देशमुख, केईएम रुग्णालय, अधिष्ठाता 


मुंबईत 20 ते 29 वर्षे वयोगटातील 68,345 तरुणांना संसर्ग 

मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक विळखा तरुण वर्गास बसत असून 20 ते 29 वर्षे वयोगटातील 68,345 तरुणांना बसला आहे. त्यापैकी, आत्तापर्यंत 127 तरुणांना करोनाने जीव गमावण्याची वेळ आली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यातून तरुण वर्गदेखील सुटलेला नाही. त्यामुळे, तरुणांनी बाहेर पडताना जास्तीत जास्त काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत.

(संपादन - दीनानाथ परब)