Elphinstone Bridge Closure
ESakal
Mumbai Traffic: मुंबईकरांची तासन्तास रखडपट्टी! एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे वाहनांच्या रांगा
मुंबई : शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचे मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकारणामार्फत पाडकाम सुरू करण्यात आले आहे. शुक्रवार (ता. १२) रात्रीपासून हा पूल बंद करून वाहतूक वळवल्यामुळे झालेल्या कोंडीत शनिवारी वाहनचालकांना तासन्तास रखडपट्टी झाली होती. भारतमाता, करी रोड आणि टिळक पुलावर वाहनांची एक किलोमीटरपर्यंत रांग लागून तासन्तास रखडपट्टी होत होती. शिवाय, प्रचंड वळसा पडत असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागातर्फे एल्फिन्स्टन पूल नव्याने बांधण्यात येणार आहे. नवीन एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी एल्फिन्स्टन पुलामार्गे जाणारी वाहतूक शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्यात आली आहे.
दादर पूर्व-पश्चिमकडे आणि दादर मार्केटकडे जाणारे वाहनचालक हे टिळक पुलावरून, परळ पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परेलला जाणारे वाहनचालक हे करी रोड पुलावरून, तर परळ, भायखळा पूर्वेकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी-लिंकच्या दिशेने जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी पुलाचा वापर करीत आहेत.
तसेच दादर पश्चिमेकडून दादर पूर्वेकडे जाणारे वाहनचालकही हे टिळक पुलाचा वापर करावा लागत आहे. प्रभादेवी आणि लोअर परेल पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय व केईए रुग्णालय येथे जाणारे वाहनचालक हे करी रोड पुलाचा वापर करतील. कोस्टल रोड आणि सी-लिंकने व प्रभादेवी, वरळीकडून परळ, भायखळा पूर्वकडे जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी पुलाचा वापर करीत आहेत. एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यामुळे अन्यत्र ताण वाढल्यामुळे त्याचा फटका माटुंगा आणि सायन परिसरातील वाहतुकीलाही बसल्याचे दिसून आले.
पोलिसांशी वाद
दादर येथील मार्केटमध्ये शनिवार आणि रविवारी खरेदीसाठी मोठी गर्दी असते. पूल बंद झाल्यामुळे शनिवारी प्रचंड कोंडीत झाली होती. परळ जंक्शनवर मोठी वाहने आल्याने आणखीनच गोंधळ उडाला. यामुळे वाहनचालक आणि पोलीस यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवल्याचेही दिसून आले.
पर्यायी मार्ग
टिळक पूल : दादर पूर्व ते पश्चिम
करी रोड पूल : परळ पूर्व ते प्रभादेवी आणि लोअर परेल
चिंचपोकळी पूल : परळ आणि भायखळा पूर्व ते प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड आणि सी-लिंक
सुट्टी असूनही वाहतूक कोंडी
अनेक कार्यालयांना शनिवारी सुट्टी असूनही टिळक, भारतमाता आणि करी रोड या तिन्ही पुलांवर वाहतूक कोंडी झाली होती.
सकाळी आणि सायंकाळी वाहतूक ठप्प होऊन वाहनचालकांची तासन्तास रखडपट्टी झाली होती.
कोंडीची अन्य ठिकाणे
दादर टीटी जंक्शन, कबुतरखाना जंक्शन, भवानी शंकर रोड, परळ जंक्शन, भारतमाता जंक्शन, चेमटे मास्तर चौक, ना. म. जोशी मार्ग
नागरिकांची दमछाक
एल्फिन्स्टन पूल बंद केल्यामुळे नागरिकांना पुलाच्या पायऱ्यांवरून वळसा घालून जावे लागत होते. तसेच प्रभादेवी स्थानकाकडे येताना त्या पायऱ्या चढून जाव्या लागत असल्यामुळे ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांचे हाल झाल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.