मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही ; मंगल प्रभात लोढा यांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही ; मंगल प्रभात लोढा यांचा इशारा

sakal_logo
By
कृष्णा जोशी ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर धार्मिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. मात्र आम्ही मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे दिला.

त्रिपुरातील परिस्थितीसंदर्भातील अफवांवरून महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, नांदेड येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. त्याच्या निषेधार्थ मुंबई भाजपतर्फे आज महापालिकेसमोरील अमर जवान ज्योतीशेजारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांसमोर बोलताना लोढा यांनी वरीलप्रमाणे इशारा दिला.

त्रिपुराबाबतच्या अफवांवरून नांदेड, अमरावती, मालेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. असा हिंसाचार करणारे धिक्कारार्ह आहेत. नुकत्याच पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर तेथे मोठ्या प्रमाणात धार्मिक हिंसाचार उफाळला होता. त्यात भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. तर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर राज्यातही हिंसक घटना वाढत आहेत. मात्र आम्ही मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही. आम्ही मुंबईत असा धार्मिक हिंसाचार होऊ देणार नाही, असेही लोढा यांनी बोलून दाखवले.

हेही वाचा: कांदे भजी मऊ होऊ नये म्हणून वापरा 'ही' ट्रिक

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दंगलखोरांचा एक खास वर्ग सक्रिय होत असल्याने हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. या सर्व हिंसक घटनांमुळे राज्यातील हिंदू कुटुंबे आणि संस्थांचे नुकसान होत आहे. तसेच अफवांचा आधार घेऊन उघडपणे गुंडगिरी करत पोलिसांवर देखील लाठ्या-काठ्यांसह दगडफेक केली जात आहे. असा हिंसाचार मुंबईत होऊ देणार नाही असेही लोढा म्हणाले. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व आमदार प्रविण दरेकर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: शरद पवारांच्या एन्ट्रीमुळे आमदार शिंदेंची कोंडी फुटणार?

या हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपतर्फे मुंबईत अनेक ठिकाणी निषेध आंदोलने केली जात आहेत. सोमवारी दुपारी बारा वाजता वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल.

loading image
go to top