मास्क लावण्यास सांगणं क्लिनअप मार्शला पडलं महागात, डोक्यात घातला पेव्हर ब्लॉक

समीर सुर्वे
Thursday, 3 December 2020

मास्क लावण्यास सांगितलं म्हणून महिला क्‍लिनअप मार्शल दर्शना चौहान (27वर्ष) यांच्या डोक्‍यात पेव्हर ब्लॉक मारल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी भांडूप येथे घडला आहे.

मुंबईः  मास्क लावण्यास सांगितलं म्हणून महिला क्‍लिनअप मार्शल दर्शना चौहान (27वर्ष) यांच्या डोक्‍यात पेव्हर ब्लॉक मारल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी भांडूप येथे घडला आहे. या प्रकरणी तीन महिलांवर भांडूप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले. तसेच मास्क न वापरण्याकडून 200 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. मात्र हा दंड मागणे भांडूप येथे एका महिला क्‍लिन अप मार्शलच्या जीवावर बेतले आहे. भांडूप रेल्वे स्थानकाजवळील मोतीबाई वाडी या परिसरात रोहिणी दोंदे ही महिला सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरत होती. मार्शल दर्शना चौहान यांनी रोहिणी दोंदे यांना मास्क लावण्यास सांगितल्यावर त्यांनी शिवीगाळ सुरु करण्यास सुरुवात केली.

अधिक वाचा-  वकीलांना पुन्हा एकदा दिलासा, तिसर्‍यांदा लोकल प्रवासासाठी मुदतवाढ

हा वाद सुरु असताना दोंदे याच्या सोबत शोभा दोंदे आणि सीमा भंडारे या दोन महिला आल्या. त्यांनी दर्शना चौहान यांच्या डोक्‍यात पेव्हर ब्लॉक मारला. त्यामुळे दर्शना यांच्या डोक्‍यावर गंभीर दुखापत झाली आहे. रोहिणी दोंदे, शोभा दोंदे आणि सीमा भंडारे या तिघींनाही अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा-  दुसऱ्या अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर संजय राऊत ICU मध्ये

यापूर्वीही दादर परिसरात एका गर्दुल्याने मास्कच्या वादावरुन पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. यावरुन अनेक वेळा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वादही घालावे लागतात.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai woman beat up the lady cleanup marshal Head injury


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai woman beat up the lady cleanup marshal Head injury