मुंबईकरांची उकाड्यातून काही अंशी सुटका, मुंबईत जोरदार पावसाची शक्यता 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 1 जून 2020

सकाळी सकाळी मुंबईत पावसाचं आगमन झाल्यानं मुंबईकर चांगलाच सुखावला आहे.

 

मुंबई- गेल्या दोन महिन्यांपासून उकाड्यानं हैराण असलेल्या मुंबईकरांना पावसानं आज दिलासा दिला आहे. पहाटे विजांच्या कडकडाटासह पावसानं आज मुंबईत हजेरी लावली. त्यामुळे सकाळी सकाळी मुंबईत पावसाचं आगमन झाल्यानं मुंबईकर चांगलाच सुखावला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातून त्यांची काही अंशी सुटका झाली आहे. केरळमध्ये मान्सून 48 तास आधीच दाखल झाल्याचा दावा स्कायमेटनं केला आहे. 

जिद्दीला सलाम! मुंबईतील तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात....

अरबी समुद्रातून वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे हवामानात बदल होताना दिसताहेत. येत्या 48 तासांत महाराष्ट्रासह गुजरातमध्ये वादळीवाऱ्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मंगळवारी मुंबईत मुसळधार पाऊस

अरबी समुद्राच्या अग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून येत्या 48 तासांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते 3 जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करेल. यामुळे किनारपट्टीवर जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईमध्येही मंगळवारपासून पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईकरांनो सावधान ! ३ जूनला चक्रीवादळ महाराष्ट्र किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

मुंबईमध्ये रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सोमवारी ही आकाश ढगाळ राहील. तर मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार 3 जूनला मुंबईतील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात वाऱ्यांचा जोरही वाढलेला असेल. 3 आणि 4 जून या दिवशी मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असाही इशारा देण्यात आला असून सध्या समुद्रात असलेल्या मच्छिमारांनी किनाऱ्याकडे परतावे अशा सूचनाही दिल्या आहेत. 

कसं होणार? 1 लाख नागरीकांसाठी फक्त 21 डॉक्‍टर; पुर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर
 

आज दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. 2 आणि 3 जूनला कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या बुधवारी आणि गुरूवारी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आहे. मात्र काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची ही शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbaikars get some relief from humidity, possibility of heavy rains in Mumbai