मुंबईकरांनो, गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

समीर सुर्वे
Tuesday, 11 August 2020

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमारेषेवर चाकरमान्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे, त्यामुळे तिथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे.

मुंबई : येत्या 22 ऑगस्ट रोजी सर्वत्र गणपतीचे आगमन होणार आहे. यंदा कोरोना संकटामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग कोकणात पसरू नये म्हणून स्थानिक प्रशासनाने चाकरमान्यांना 7 ते 14 दिवस क्वारंटाईनची अट घातली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गुरुवारपासून मोठ्या प्रमाणात मुंबईतून चाकरमानी कोकणात जाण्याची शक्यता आहे. 

हिंदमातासाठी आता नवा प्रयोग; पाणी वाहून जाण्यासाठी बोगद्याचा विचार, वाचा सविस्तर

एवढेच नव्हे तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमारेषेवर चाकरमान्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे, त्यामुळे तिथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे. त्यासोबत सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांचीही अनेक ठिकाणी दुरवस्था झाल्याने वाहतूक संथगतीने सुरु आहे.

कोव्हिडमुळे वाहन उद्योगाला मोठा फटका! व्यवसायात जुलैमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठी घट

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांपुढे आता आणखी एक नवं आव्हान उभे ठाकले आहे. या आठवड्यात मुंबई वगळता संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कायम राहाणार आहे. मुंबईत पुढील तीन दिवस हलक्या सरी कोसळणार असून शनिवारी काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. शुक्रवार पासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.त्यामुळे गणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना त्यांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

आता चिंता नको! हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून पालिकेसाठी 'ही' आनंदाची बातमी

मुंबईत आज दिवसभर ढग दाटून होते.मात्र अधून मधून पावसाचा हलका शिडकावा होत होता. पुढील तीन दिवस शहरात हलक्या सरीचा अंदाज आहे.तर कोकणातील इतर जिल्ह्यांच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी आणि शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागात शनिवारी अशीच परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे पावसामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbaikars planning to go hometown in konkan may face new problem in journey