प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मुंबईकरांचा सायकलिंगकडे कल; विक्रीत 60 टक्‍के वाढ

प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मुंबईकरांचा सायकलिंगकडे कल; विक्रीत 60 टक्‍के वाढ
प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मुंबईकरांचा सायकलिंगकडे कल; विक्रीत 60 टक्‍के वाढ

मुंबई : कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता अनेक मुंबईकरांनी सायकलिंगकडे आपला मोर्चा वळवला आहे. सध्या नागरिकांकडून 10 ते 15 हजारांपासून 40 ते 60 हजारांपेक्षा अधिक रुपयांची सायकल खरेदी केली जात असून, विक्रीत 60 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. दरम्यान, सायकलचा वापर वाढला असला तरी पुरवठा कमी होत असल्याने अनेक ग्राहकांना सायकलकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे. 

कोरोनामुळे शहरात व्यायाम शाळा, स्वीमिंग पूल बंद असल्याने नागरिकांना व्यायाम करण्याकरिता कोणताही पर्याय नसल्याने अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. प्रतिकारशक्ती व अनेक व्याधींपासून बचाव करण्याकरिता नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव निर्माण झाल्याने त्यांचा सायकल वापराकडे कल वाढला आहे; मात्र त्या तुलनेत सायकलपुरवठा होत नसल्याने मागील सात महिन्यांत सायकलच्या भावात वाढ झाली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार सायकल देता येत नसल्याने सायकल विक्रेत्यांमध्ये परदेशातून येणाऱ्या सायकल व सायकलच्या सुट्या भागाची वाट पाहावी लागत आहे. 

आयर्न, स्टील, ऍल्युमिनियम, कार्बन अशा अनेक प्रकारच्या सायकल मिळत असल्याने त्यानुसार सायकलचा दर ठरवला जाऊन आजही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. मुंबईतील रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सायकल चालवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सायकलला पसंती वाढल्याने सायकल व्यवसायालादेखील चांगले दिवस आले आहेत. सायकलची मागणी जास्त आहे, परंतु पुरवठा कमी असल्याने अनेक ग्राहकांना सायकलच्या दुकानातून रिकाम्या हाती घरी परतावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वी साधारण असलेला सायकल व्यवसाय काही महिन्यांतच एवढी भरारी घेईल असे सायकल व्यापाऱ्यांनादेखील वाटले नव्हते. त्यामुळे सायकल व्यापारीदेखील आनंदात आहेत. 

दरवर्षीच्या तुलनेत यंदा सायकल विक्रीत 60 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. दुकानात सायकल व त्यासाठीच्या अन्य साधनांचा तुटवडा आहे. सायकलचे काही साहित्य हे केवळ चीनमध्ये तयार होते; मात्र चीनसोबत बिघडलेल्या व्यापार संबंधांमुळे हे साहित्य उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. ग्राहकांनी सायकल खरेदी केल्यास त्यांना एक ते दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर सायकल मिळते. याआधी सायकलची विक्री व्हावी यासाठी वेगवेगळ्या सूट योजना ठेवाव्या लागत होत्या; मात्र आता ग्राहक आहे त्या किमतीत सायकल विकत घेत आहेत. 
- आफरोज मलिक, सायकल व्यापारी, घाटकोपर.

माझ्या दुकानातून दररोज 100 सायकल विकल्या जातात. पाच हजार ते 50 हजारापर्यंत किमतीच्या सायकल दुकानात उपलब्ध आहेत. साधारणतः ग्राहक 10 ते 20 हजारदरम्यान उपलब्ध असणारी सायकल पसंत करीत आहेत. तरुण विशेषतः गिअर असलेली सायकल घेणे पसंत करत आहेत. कोरोनाच्या काळात चीनविरोधी वातावरण निर्माण झाल्याने ग्राहक भारतीय ब्रॅंडची सायकल घेणे जास्त पसंत करीत आहेत. 
- जसपाल नारंग, सायकल विक्रेते, चेंबूर 

सायकलिंगमुळे हृदयाच्या रक्तशुद्धीकरण व ऑक्‍सिजनची क्षमता वाढते. प्रतिकारशक्ती वाढते. सायकलिंग हा व्यायामाचा प्रकार असून तो शरीराकरिता उत्तम आहे. सायकल चालवल्याने प्रदूषण होत नाही. पैशांची बचत होते व आरोग्यही चांगले राहते. म्हणून आरोग्य उत्तम राहण्याकरिता प्रत्येकाने सायकल चालवणे गरजेचे आहे. मी सायकल गेल्या मे महिन्यात विकत घेतली आहे. दररोज पहाटे सायकल चालवल्याने एक वेगळी शक्ती मिळत आहे. 
- हिरा सिंग, ग्राहक. 

---------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com