मुंबईतील इलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठ मंदीच्या विळख्यात; ग्राहकांअभावी व्यापारी चिंतेत...
मुंबईतील इलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठ मंदीच्या विळख्यात; ग्राहकांअभावी व्यापारी चिंतेत...

मुंबईची इलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठ मंदीच्या विळख्यात; ग्राहकांअभावी व्यापारी चिंतेत...

मुंबई  : लॅपटॉप, डेस्कटॉप आणि अन्य साहित्य घ्यायचे असेल तर मुंबईच्या लॅमिंग्टन रोडच्या इलेक्‍ट्रॉनिक मार्केटशिवाय पर्याय नाही. दिल्लीतील नेहरू प्लेसनंतर देशातील हे दुसरे सर्वांत मोठे इलेक्‍ट्रॉनिक्‍स मार्केट आहे; मात्र लॉकडाऊनमुळे चार महिने हे मार्केट बंद होते. अनलॉकनंतर बाजार सुरू झाला; मात्र अत्यावश्‍यक सेवेची खरेदी सोडल्यास बाजारात अजूनही ग्राहक फिरकत नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सर्व दुकानांनी कोव्हिड प्रतिबंधक उपाययोजना केल्या. ग्राहकांच्या हाती पैसाच नसल्याने खरेदीला चाप बसल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

नोटबंदी आणि जीएसटीमुळे इलेक्‍ट्रॉनिक व्यापाऱ्यांचे मोठे हाल झाले. व्यवसायात कधी तेजी तर कधी मंदी येत होती. त्यातच लागलेल्या लॉकडाऊनमुळे लॅमिंग्टन रोडमधील सर्व दुकाने बंद झाली. उद्योग, व्यापार, नोकरीपेक्षा जीव महत्त्वाचा म्हणून लोकांनी घरात राहणेच पसंत केले. या मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या बाहेरून अगदी कसारा, कर्जत, पनवेल, डहाणू ते गुजरातच्या काही भागांतून ग्राहक येत होते; मात्र रेल्वे सेवा सुरू होत नाही तोपर्यंत ग्राहक खरेदीसाठी येणार नाहीत. अनलॉक होऊन दोन महिने झालेत; मात्र दिवसभरात मोठ्या मुश्‍कीलीने एक ते दोन लॅपटॉपची विक्री होते, असे मयूर जैन यांनी सांगितले. 

 
गणेशोत्सव काळात मार्केट थंड 
गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपक, मनोरंजनाकरिता लागणारी इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी व्हायची; मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी केवळ 20 टक्के विक्री झाली आहे. मोठे ग्राहकच येत नाहीत, त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे, असे ओम साई इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे विजय आव्हाड आणि अरिहंत इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे हरीभाई शहा म्हणतात. कोरोनामुळे लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हातात पैसे नाहीत, त्यामुळे अत्यावश्‍यक वस्तू सोडल्यास खरेदी करायला कुणी तयार नाही. 

दुकानदारांच्या अडचणी 
दुकानदारांना माल रोखीत आणि चढ्या भावाने घ्यावा लागत आहे. कारण अजून नवे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. त्यातच भरमसाट आलेले वीजबिल, कामगारांचा पगार, त्यांचा रोजचा दैनंदिन खाण्यापिण्याचा खर्च, दुकानाचे भाडे आणि लॉकडाऊनमध्ये वसूल न झालेली उधारी या समस्या आहेत. या मार्केटमधील काही मोठे, किरकोळ व्यापारी चीन व हॉंगकॉंगवरून इलेक्‍ट्रॉनिक्‍स माल मागवतात; मात्र लॉकडाऊनध्ये मालाच्या शिपमेंटवरही परिणाम झाल्याचे व्यापारी सांगतात. ई-कॉमर्स व्यापारही इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्यापाऱ्यांच्या मुळाशी आला आहे. लॉकडाऊनमध्ये घरपोच वस्तू मागवण्याची सवय पडल्याने मार्केटची परिस्थिती पूर्वपदावर येण्यास खूप वेळ लागेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या ऑनलाईन व्यवसाय करीत असल्यामुळे आधीच संकट आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. ऑनलाईन विक्री कंपन्यांवर बंदी आणावी, नाही तर भारतीय व्यापार धुळीस मिळेल. मार्केट बंद झाल्यास मोठी बेरोजगारी वाढण्याची शक्‍यता आहे. 
- भावेश जैन, व्यावसायिक. 

वस्तूंचे उत्पादन करणारे आता उधारीवर माल देत नाहीत. याशिवाय त्यांनी आधीची बाकी रक्कम भरा, आता रोखीत माल घ्या, असा तगादा लावला असून माल चढ्या भावाने विकत आहेत. त्यामुळे माल घेणेही कठीण झाले आहे. 
- अमन जैन, लॅपटॉप विक्रेता. 

-------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com