कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाने घेतला महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

आतापर्यंत गेल्या तीन महिन्यातील सण अतिशय साधेपणाने घरातल्या घरातच साजरे करण्यात आले. अनेक प्रतिष्ठानांनी दहिहंडीचा उत्सव रद्द केला आहे. त्यापाठोपाठ गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प अनेक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यातील कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने यंदाच्या सण-उत्सवावर मोठा परिणाम झाला आहे. आतापर्यंत गेल्या तीन महिन्यातील सण अतिशय साधेपणाने घरातल्या घरातच साजरे करण्यात आले. अनेक प्रतिष्ठानांनी दहिहंडीचा उत्सव रद्द केला आहे. त्यापाठोपाठ गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प अनेक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.

अरे बापरे ! आता संजय गांधी नॅशनल पार्कमधल्या आनंद वाघालाही...

नुकतेच मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा मूर्तीची स्थापना करण्याएवजी आरोग्योत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यापाठोपाठ आता 101 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या गिरणगावातील चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठापना यंदा मंडळाच्या देव्हार्‍यातील पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीने करण्यात येणार आहे. यावर्षी दरवर्षीप्रमाणे मूर्ती घडवण्यात येणार नाही. चांदीची मूर्तीची पूजा करून गणेशोत्सवाची परंपरा अखंडित राखण्यात येणार आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ! मुंबईकरांनो हवामान खातं म्हणतंय....

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने देशात प्रसिद्ध असलेला चिंतामणीचा आगमन सोहळा, पाटपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केल्याचे आधीच जाहीर केलेले आहे.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मूर्तीची उंचीबाबत बोलताना मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्वाची असे आवाहन केले. याला सकारात्मक प्रतिसाद देताना, सद्यपरिस्थितीत धार्मिक बाब, चिंतामणी भक्त, शासन यंत्रणा, पोलिस यंत्रणा, जनतेचं आरोग्य या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करून मंडळाच्या आदर्शवादी भूमिकेची जाण ठेवून मंडळाने यावर्षी गणेशोत्सवाची धार्मिक परंपरा खंडित होऊ न देता मंडळात पुजल्या जाणार्‍या पारंपारिक चांदीच्या गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष  उमेश सीताराम नाईक यांनी दिली आहे. 

कोरोनावरील सर्वात प्रभावी अशा 'टॉसिलीझुमॅब'चा तुटवडा, परिणाम होंतोय नवी मुंबई ठाण्यातील रुग्णांवर

त्याचबरोबर मंडळाने हे वर्ष जनआरोग्य वर्ष म्हणून जाहीर करताना गणेशोत्सव काळात रक्तदान शिबीर, आरोग्य चिकित्सा, रुग्णसाहित्य केंद्र, शासकीय रुग्णालयास वैद्यकीय उपकरण आणि 101 कोव्हिड योद्धयांचा सन्मान असे विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी दिली आहे. मंडळ या वर्षी मंडपासमोर कृत्रिम तलाव बांधून तेथे विभागातील घरगुती गणेश मूर्तीना विसर्जनासाठी उपलब्ध करून देणार आहे. यावर्षी कोरोनाच्या लढाईसाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 3 लाख 51 हजार रुपये सुपूर्द केले. जनसेवा हीच ईश्वरसेवा या तत्वानुसार मंडळ यावर्षी उत्सव साधेपणाने साजरा करून जनतेचे आरोग्य जपण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbais famous chinchpokalicha chintamani decided to celebrate ganesh festival simply