Dombivli News : डोंबिवलीत महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन; उमेदवार वैशाली दरेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटातील उमेदवारांत चुरशीची लढत होणार आहे.
mva candidate vaishali darekar file nomination lok sabha election india alliance rally
mva candidate vaishali darekar file nomination lok sabha election india alliance rallySakal

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटातील उमेदवारांत चुरशीची लढत होणार आहे. मंगळवारी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी डोंबिवलीत युवा सेना नेते आदित्य ठाकरे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली.

यावेळी इंडिया आघाडीतील घटकपक्षांची मोठी गर्दी दिसून आली. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. निवडणूकांच्या काळात कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन म्हणजे एक वेगळा उत्साह, जोशपूर्ण वातावरण शहरात पहायला मिळते.

शिवसेनेतील फुटीनंतर पहिलीच लोकसभेची निवडणूक होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असे वातावरण असून ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

शिवसेना शिंदे गटास भाजप, मनसेची साथ लाभल्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्जाच्या मिरवणूकीत एक वेगळेच वातावरण डोंबिवलीत पहायला मिळेल असे बोलले जात आहे. परंतू त्यांच्या विरोधात असलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या रॅलीला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून शिवसैनिकांनी इंदिरा गांधी चौकात जमण्यास सुरुवात केली. उमेदवार वैशाली दरेकर यांनी डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेत आर्शिवाद घेतला.

त्यानंतर इंदिरा गांधी चौक येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेच्या जवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची एन्ट्री झाली. आदित्य यांना पाहताच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारल्याचे पहायला मिळाले.

जसजशी वेळ वाढत होती, सूर्य डोक्यावर येत होता तसतसे कार्यकर्त्यांची गर्दी आणखी वाढून त्यांचा जोश देखील वाढत होता. मध्यवर्ती शाखा येथून चार रस्ता, टिळक रोड, शेलार नाका, घरडा सर्कल मार्गे र्रली मार्गस्थ झाली.

कळवा मुंब्रा, कल्याण डोंबिवली, दिवा, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, 14 गाव परिसर येथून शिवसैनिक दरेकर यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते. ढोल ताशांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली. विटेंज कार घेऊन शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले. हा कार सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला.

- उमेदवारी वैशाली दरेकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी युवा सेना नेते आदित्य ठाकरे, सचिव वरुण सरदेसाई, आमदार जितेंद्र आव्हाड, सदानंद थरवळ, जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी हृता आव्हाड, महेश तपासे यांसह अनेक पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.

- या रॅलीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, आपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची जास्त गर्दी दिसून आली.

- माजी आमदार सुभाष भोईरांची उपस्थिती

कल्याण लोकसभा निवडणूकीसाठी सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला आघाडीवर होते. तत्पूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्या सभा झाल्या होत्या. त्यावेळी माजी आमदार सुभाष भोईर हे उपस्थित नसल्याने ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.

मात्र मंगळवारी उमेदवार वैशाली दरेकर यांच्या रॅलीत त्यांनी आपली उपस्थिती लावल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या. तरीही भोईर हे लांब लांब रहात असल्याने त्यांच्या गोटात नक्की काय खलबत सुरु आहेत याची चर्चा सुरु होती.

डोंबिवलीतील शिवसैनिकांची अनुपस्थिती

वैशाली दरेकर यांच्या रॅलीत वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले असले तरी, डोंबिवली शहर शाखेतील महत्वाच्या काही पदाधिकाऱ्यांची मात्र अनुपस्थिती दिसून आली. दरेकर यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील एक गट नाराज आहे.

दरेकर यांच्यासोबत प्रचारासाठी ते पदाधिकारी कोठेही दिसून आले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी पदाधिकारी उपस्थिती लावतील असे बोलले जात होते. मात्र शहर अध्यक्षांसह इतर पदाधिकारी कोठेही दिसून आले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com