महाविकास आघाडीने रोखला महामार्ग; आंदोलनामुळे वाडा-भिवंडी मार्गावर कोंडी | MVA Strike Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Strike

महाविकास आघाडीने रोखला महामार्ग; आंदोलनामुळे वाडा-भिवंडी मार्गावर कोंडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाडा : तालुक्यातील नारे ग्रामपंचायत (Nare Grampanchayat) हद्दीत असलेल्या सेंट गोबेन (जिप्सम) या कंपनीने (Gypsum Company) ६०-७० कामगारांना अनेक वर्षे काम करूनही कामावरून काढून (Workers job issue) टाकले. या कामगारांना कामावर घेण्यात यावे या व अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी (Maha vikas Aghadi) भिवंडी-वाडा महामार्गावरील (bhivandi-wada highway) कुडूस नाका येथे सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन (strike) केले. या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने सर्व खात्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावून यावर मार्ग काढू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा: मुंबई : SRA मध्ये घर मिळवून देण्याच्या अमिषानं अनेकांना लुटणाऱ्याला अटक

नारे ग्रामपंचायत हद्दीत सेंट गोबेन इंडिया कंपनी असून, या कंपनीत पीओपी पावडरचे उत्पादन घेतले जाते. कंपनी प्रशासनाने किरकोळ कारणे दाखवून स्थानिक ६०-७० कामगारांना कामावरून काढून टाकल्याचा आरोप होत आहे. कामावरून कमी केलेल्या कामगारांच्या जागी परजिल्ह्यातील ३५ अभियांत्रिकीधारकांची भरती केली. हे कामगार नागपूर, सांगली-कोल्हापूर, नाशिक या भागातील आहेत. याला विरोध करण्यासाठी व कामगारांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी आज कुडूस नाका येथे तीन तास रास्ता रोको आंदोलन छेडले.

या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार उद्धव कदम यांनी आंदोलन स्थळ गाठून कंपनी व्यवस्थापकांना आंदोलन स्थळी बोलावून घेतले. व्यवस्थापक दिनेश बागुल यांनी स्थानिक भूमिपुत्र कामगारांविरोधात प्रशासनाने केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेऊन चर्चा केली. या वेळी येत्या सोमवारी (ता. २२) तहसीलदार, पोलिस अधिकारी, कामगार आयुक्त, प्रदूषण विभाग व जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कामगार यांच्यात बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे सांगण्यात आले.

आंदोलनात शिवसेना नेत्या ज्योती ठाकरे, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, प्रफुल्ल पाटील, राष्ट्रवादीचे रोहिदास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख उमेश पटारे, मिलिंद चौधरी, धनंजय पष्टे, कैलास पाटील तसेच इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

loading image
go to top