esakal | "खरं भुताटकी मंत्रालय 'मातोश्री' बंगल्यावर"; नारायण राणेंची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray
  • ठाकरे सरकारच्या भ्रष्ट्राचाराची प्रकरणं मीच उघड करणार!

  • उद्धव ठाकरे कोकणात पिकनिकला गेले होते का? राणेंचा सवाल

  • उदय सामंत पक्षात समाधानी नसल्याने भेटले असतील, त्यांचं स्वागतच आहे!

"खरं भुताटकी मंत्रालय 'मातोश्री' बंगल्यावर"; राणेंचे टीकास्त्र

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: भाजप नेते नारायण राणे विरूद्ध शिवसेना (Narayan Rane vs Shivsena) हा सामना महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार (MVA Govt) आल्यापासून तर नारायण राणे अधिक आक्रमक स्वरूपात आपली भूमिका मांडतात. गेल्या काही दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) नुकसान पाहणी दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) तीन तासांत आटोपला. शिवसेनेच्या संजय राऊतांनी (Sanjay Raut) राजभवनात भुताटकी आहे का? असा खोचक सवाल केला. मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) सरकारवर टीका झाली. शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant) यांची देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी गुप्त भेट झाल्याची चर्चा रंगली. या साऱ्या मुद्द्यांवर नारायण राणेंनी सडेतोड मत व्यक्त केलं. (Narayan Rane slams CM Uddhav Thackeray Shivsena Konkan Tour Uday Samant Fadnavis Meeting)

हेही वाचा: राज आणि उद्धव ठाकरेंच्या शिक्षिकेला वादळाच्या तडाख्याचा फटका

"महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीला आठ दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) झोडपून काढलं. या नुकसानीची पाहणी करायला गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या तीन तासांत पाहणी कशी काय केली? ते कोकणात पिकनिकला गेले होते का? पाहणी दौरा होता तर ते तेथील लोकांना का भेटले नाहीत? १० दिवस झाले तरी अजूनही पॅकेज का जाहीर करण्यात आलेले नाही?" असे काही रोखठोक सवाल नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला केले.

हेही वाचा: मविआ सरकारमधील काँग्रेस आमदाराचा शिवसेनेवर संताप

"कोरोनाच्या औषधांच्या टेंडरमध्ये हे सरकार पैसे खातं आहे. प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार मी उघड करणार आहे, कारण भ्रष्टाचाराने माखलेले असे हे सरकार आहे. सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मागे मी लागणार आहे. सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यासहीत समोर आणणार आहे. सध्या मुख्यमंत्री कार्यालयाचंही प्रकरण मी प्रामुख्याने समोर आणलंय. कोरोनाच्या नावाखाली यांची टक्केवारी वाढली आहे. हे सारं चुकीचं आहे", असं मत त्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा: "तर ठाकरेंचे जगात कारखाने असते"; नितेश राणेंची बोचरी टीका

विधानपरिषदेसाठी राज्य सरकारने १२ नावांची एक यादी राजभवनाकडे पाठवली होती. या यादीवर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही. ही फाईल आमच्याकडे नाही, असं उत्तर राजभवनाकडून देण्यात आलं होतं. त्यावर बोलताना, 'राजभवनात भुताटकी तर नाही ना', अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली होती. यावर आज राणेंनी प्रत्युत्तर दिलं. "राज्यपालांवर ठराविक वेळेतच नावे मंजूर करण्याचे बंधन नाही. पण भुताटकी बद्दल म्हणत असाल तर भुताटकी मंत्रालय हे सध्या वर्षा आणि मातोश्री या बंगल्यांवर आहे. त्यामुळे तेथे आधी शांती, पूजा वगैरे करून घ्या", असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा: लॉकडाउन कधी उठवणार? राज्याच्या मंत्र्याने दिलं स्पष्ट उत्तर

मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका झाली. तसेच, शिवसेना नेते उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुप्त भेट झाल्याची चर्चा रंगली. यावर नारायण राणे म्हणाले, "मराठा आरक्षण न मिळण्यामागे उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या मनात आरक्षण देण्याचे नाही. बहुतेक अशाच धोरणांमुळ उदय सामंत पक्षात समाधानी नसतील, म्हणून ते भेटले असतील. त्यांनी मी सांगतो की ते आमच्या पक्षात आले तर मी त्यांचे स्वागतच करेन."