'पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा दिला राजीनामा'; भाजपला मोठा शॉक...

'पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा दिला राजीनामा'; भाजपला मोठा शॉक...

मुंबई : मुंबईच्या मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. येत्या २६ फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुक होणार आहे. मात्र त्याआधीच मीरा-भाईंदरचे भाजपचे नेते नरेंद्र मेहता यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. नरेंद्र मेहता यांनी याबद्दलचा एक व्हिडियो अपलोड केला आहे. “माझ्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे मी पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत आहे”, असं या व्हीडियोमध्ये नरेंद्र मेहता यांनी म्हंटलंय.  दरम्यान नरेंद्र मेहता हे पक्षाच्या जेष्ठ नेत्यांवर नाराज आहेत अशी माहिती मिळतेय.

काय आहे मेहतांच्या नाराजीचं कारण:

नरेंद्र मेहता हे माजी आमदार आहेत. मीरा भाईंदरमध्ये भाजपचे २ गट आहेत. एक गट मेहता यांचा तर दूसरा गट विद्यमान आमदार गीता जैन यांचा आहे. नरेंद्र मेहतांनी रुपाली शिंदेंना महापौर आणि ध्रुवकिशोर पाटील यांना उपमहापौर बनवण्यासाठी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना सुचवलं होतं. मात्र पक्षांच्या नेत्यांनी आज दोन्ही नावं वगळून ज्योत्स्ना हसनाळे यांना महापौर आणि मदन सिंह आणि हसमुख गेहलोत यांना उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले होते. यावर नरेंद्र मेहता नाराज होते आणि म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

कोण आहेत नरेंद्र मेहता :
 
नरेंद्र मेहता हे २००२ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००७ मध्ये ते मीरा-भाईंदरचे महापौर झाले. त्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा आमदार म्हणून त्यांना जनतेचा आशिर्वाद मिळाला होता. मात्र त्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले होते. मात्र यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. महापौर निवडणूक जिंकायची आणि आपलं वर्चस्व पुन्हा महापालिकेवर स्थापन करायचं असा मानस मेहता यांचा होता.

मात्र पक्षातल्या नेत्यांनी त्यांची मागणी पूर्ण न केल्यामुळे मेहता यांनी राजीनामा दिला. त्याच्या या राजीनाम्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा शॉक बसला आहे.

narendra mehata resigned from all the post of bjp big shock for bjp in mumbai         


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com