प्रदूषणाच्या फटक्याने 'ते' जीवानिशी मरतायेत...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ आणि शहरी भागातून येणारे सांडपाणी, पर्यायाने होणारे जलप्रदूषण यामुळे कोपरखैरणे, ऐरोली, दिवा, गोठवली, घणसोलीचा खाडीकिनारा माशांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. प्रत्येक महिन्याला कोणत्या न कोणत्या किनारी शेकडो मृत मासे आढळत आहे.

नवी मुंबई : मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ आणि शहरी भागातून येणारे सांडपाणी, पर्यायाने होणारे जलप्रदूषण यामुळे कोपरखैरणे, ऐरोली, दिवा, गोठवली, घणसोलीचा खाडीकिनारा माशांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. प्रत्येक महिन्याला कोणत्या न कोणत्या किनारी शेकडो मृत मासे आढळत आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. 

ही बातमी वाचली का? अंबा नदीतील मासे नको रे बाबा!

ऐरोली, दिघा, कोपरखैरणे, बोनकोडे, तळवली, गोठवली, घणसोली येथे खाडीलगत बांधलेल्या तलावांमध्ये मासेमारी केली जाते. भरतीचे पाणी तलावात शिरते, त्या ठिकाणी जाळी लावून मासेमारी केली जाते. नवी मुंबई परिसरात औद्योगिकीकरण वाढल्याने प्रदूषणही वाढले आहे. येथील कारखान्यांमधील सांडपाणी; तसेच रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करताच खाडीत सोडले जात असल्याने खाडी प्रदूषित झाली आहे. त्यातच भर म्हणजे गेल्या काही वर्षांपासून तलावालगत असलेल्या खारफुटीला धोका निर्माण होण्याच्या भीतीने तलावातील गाळ काढण्यास कांदळवन विभाग नकार देत आहे. त्यामुळे तलावात माशांचे बीजही तग धरत नसल्याने येथील मच्छीमार हवालदिल झाला आहे. वन विभागाची मनमानी आणि पालिकेचे दुर्लक्ष अशा तिढ्यात येथील मासेमारी अडकली आहे. 

ऐरोली, दिघा, कोपरखैरणे, बोनकोडे, तळवली, गोठवली, घणसोली या गावांमध्ये 230 हून अधिक तलाव आहेत. एका तलावामागे 2 ते 4 मच्छीमार व्यवसाय करतात. गाळ काढण्यासाठी वन विभागाचे अधिकारी, मच्छीमार, मत्स्य विभाग यांच्यासह अनेक बैठका झाल्या. मात्र त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने मच्छीमार हताश झाले आहेत. 

ही बातमी वाचली का? चिकूची आवक 30 टक्क्यांनी घटली

खारफुटीला वाचवून गाळ काढतो, असे सांगूनही वन विभाग आम्हाला परवानगी देत नाही. तर प्रक्रिया न करताच खाडीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे रोजच नुकसान सहन करावे लागत आहे. खारफुटीचा पाला कुजून आणि गाळातील रसायनांमुळे तयार होणाऱ्या अमोनियामुळे मासे मृत होत आहेत, असा अंदाज आहे. आज एका; तर उद्या दुसऱ्या तलावात मृत मासे आढळतात. हे सत्र रोजच सुरू आहे. 
- वासुदेव वेटा, अध्यक्ष, रांजण देवी मत्स्यशेती संस्था.

ही बातमी वाचली का? महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना 'मोठा' दिलासा  

खारफुटीचा पालापाचोळा कुजून तयार होणाऱ्या अमोनियामुळे माशांना ऑक्‍सिजन मिळत नाही. तसेच खाडीकिनारी एक विशिष्ट हिरव्या रंगाचे शेवाळ येते. ते विषारी आहे. खाडी किनाऱ्याचा गाळ काढल्यास या दोन्ही गोष्टी बंद होतील व त्यांचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे वन विभागाला विनंती आहे, इथला गाळ काढण्याची परवानगी घ्यावी. 
- शरद म्हात्रे, गोठीवली. 

खाडी किनारी असलेले हे तलाव वन विभागाने सिडको प्रशासनाकडून ताब्यात घेतले आहे. तो भाग संरक्षित क्षेत्रात येत असल्याने तिथला गाळ काढण्याची परवानगी देऊ शकत नाही. 
- दादासाहेब कुकडे, क्षेत्रीय वन अधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Bay beaches are life threatening for fish!