esakal | महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना 'मोठा' दिलासा!
sakal

बोलून बातमी शोधा

महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना 'मोठा' दिलासा!

महागाईने त्रस्त झालेल्या प्रवाशांना नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेने पुन्हा दिलासा दिला आहे. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मंगळवारी (ता. १८) स्थायी समितीसमोर सादर केलेल्या परिवहन सेवेच्या अंदाजपत्रकात तिकीट दरवाढ केलेली नाही. याउलट एनएमएमटीच्या ताफ्यात आणखी १०० इलेक्‍ट्रिक व ४० सीएनजी बस दाखल होणार आहे.

महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना 'मोठा' दिलासा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महागाईने त्रस्त झालेल्या प्रवाशांना नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेने पुन्हा दिलासा दिला आहे. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मंगळवारी (ता. १८) स्थायी समितीसमोर सादर केलेल्या परिवहन सेवेच्या अंदाजपत्रकात तिकीट दरवाढ केलेली नाही. याउलट एनएमएमटीच्या ताफ्यात आणखी १०० इलेक्‍ट्रिक व ४० सीएनजी बस दाखल होणार आहे. तसेच नागरिकांना त्यांची खासगी इलेक्‍ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी शहरात ३० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून त्याद्वारे हरित प्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. 

ही बातमी वाचली का? विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी..! लवकरच सुरू होतंय 'हे'केंद्र

२०२०-२१ या चालू वर्षात ७५ लाख २३ हजार ही शिल्लक रक्कम धरून ३६३ कोटी ७५ लाख २३ हजार रुपयांचा अर्थसंकल्पी अंदाजपत्रक एनएमएमटी प्रशासनाने सादर केला. या रकमेपैकी ३६३ कोटी ७० लाख ८ हजार रुपये इतकी रक्कम विविध प्रकल्प व विकासकामांवर खर्च केली जाणार आहे. विशेष म्हणजे एनएमएमटीतर्फे वाशी आगाराच्या जागेवर विकसित केल्या जात असलेल्या वाणिज्य संकुलासाठी एनएमएमटीने स्वतः ६० कोटी रुपयांची तरतूद केली असून, पालिकेकडून १३३ कोटींचे अनुदान मिळेल, अशी अपेक्षा आहे. पालिकेने एनएमएमटीला हे अनुदान दिल्यास तोट्यात चालणाऱ्या एनएमएमटीला नवसंजीवनी मिळणार आहे. 

ही बातमी वाचली का? म्हणून साई कोंड गावात पर्यटकांची गर्दी

सध्या महिन्याला साडेतीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान एनएमएमटीला सोसावे लागत आहे. वर्षाकाठी एनएमएमटी ६० ते ७० कोटींचा तोटा सहन करावा लागतो. या परिस्थितीत एनएमएमटीला टक्कर देणाऱ्या बेस्टने प्रवासी तिकीट थेट पाच रुपयांवर आणून ठेवल्यामुळे एनएमएमटीच्या प्रवाशांमध्ये घट झाली होती. सध्या अडीच ते तीन लाख प्रवासी दिवसाला एनएमएमटीने प्रवास करतात. यातून एनएमएमटीला नफा मिळत नसल्याने या अर्थसंकल्पात तिकीट दरवाढीची टांगती तलवार प्रवाशांवर होती; मात्र तिकीट दरवाढ केल्यास फटका बसण्याची शक्‍यता असल्यामुळे तूर्तास तिकीटदरवाढ न करण्याचा निर्णय एनएमएमटीने घेतला आहे.

ही बातमी वाचली का? विक्रमगडमध्ये बस स्थानकाची मागणी

पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर
केंद्र सरकारच्या फेम- १ या योजनेतून पालिकेने याआधीच ३० इलेक्‍ट्रिक बस खरेदी केल्या आहेत. सध्या या बस प्रवाशांना साध्या दरात वातानुकूलित सेवा देत रस्त्यावर धावत आहेत. या बसला मिळत असलेला प्रतिसाद पाहता आणखी शंभर बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ४० नवीन सीएनजी बसची खरेदी केली जाणार आहे. या बसप्रमाणे नागरिकांनीही जास्तीत जास्त पर्यावरणपूरक वाहने वापरावीत. याकरिता शहरात ३० ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने चार्जिंग करण्यासाठी स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्याकरीता अर्थसंकल्पात ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

ही बातमी वाचली का? अन लहानग्यांना फुटला मायेचा पाझर...

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य
केंद्र सरकारच्या धोरणानुसार रस्त्यावर धावणाऱ्या सर्व एनएमएमटी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध केलेले स्मार्ट कार्ड आता साध्या बसच्या प्रवासातही वापरता येणार आहे.

प्रवाशांना दिलासा तर परिवहन व्यवस्थापनाला उभारी देण्याचा प्रयत्न अंदाजपत्रकातून केला आहे. तसेच तिकीट दरात कोणतीही दरवाढ केली नाही. याखेरीस पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. शहरातील पर्यावरण प्रदूषण विरहित व्हावे, याकरिता इलेक्‍ट्रिक बस व सीएनजी बस खरेदी केल्या जाणार आहेत. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका.