esakal | ओवेकॅम्प गावात नागरी सुविधांची वानवा; पाण्यासाठी ग्रामस्‍थांची पायपीट | Navi mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

water scarcity

ओवेकॅम्प गावात नागरी सुविधांची वानवा; पाण्यासाठी ग्रामस्‍थांची पायपीट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खारघर : कोयना (koyana project) प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना (farmers) सरकारने स्थलांतर करताना सर्व नागरी सुविधा (Civic Amenities) उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्‍वासन दिले होते. मात्र आजही प्रकल्पग्रस्त राहत असलेल्‍या ओवेकॅम्‍प गावात (owe camp village) नागरिकांना पाणी, रस्ते, वीज अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

हेही वाचा: डोंबिवली: वाहतूक विभागाची रिक्षाचालकांवर कारवाई

कोयना प्रकल्प उभारताना १९६२ मध्‍ये सरकारने परिसरातील काही गावाचे विविध ठिकाणी स्थलांतर करून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यात खारघरमधील टाटा रुग्‍णालयाच्या मागे ओवेकॅम्प गावाची निर्मिती करण्यात आली. गाव स्थलांतर होऊन जवळपास साठ वर्षे होत आलीत. मात्र गावात आजही रस्ते, पाणी, वीज अशा अनेक समस्यांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे. सिडकोने खारघर शहराची निर्मिती केल्यावर गावात अनेक सुविधा प्राप्त होतील, असे वाटत होते.

मात्र गावात कोणतेही काम केले नाही. ओवे ग्रामपंचायतच्या माध्यमातून किरकोळ कामे केली जायची. आता पनवेल महापालिका अस्तित्वात आल्‍यावर गावाचा विकास होईल, असे वाटत होते. मात्र गेल्या चार वर्षात पालिकेने साधी रस्त्याची कामेही केली नाहीत. गावात असलेल्या जलकुंभात वेळी यावेळी पाणी सोडले जाते. त्‍यामुळे पुरवठाही तसाच होतो. पावसाळ्यात ही स्‍थिती, तर उन्हाळ्यात काय होईल, असा प्रश्‍न परिसरातील महिलांकडून विचारण्यात येत आहे.

हेही वाचा: 'आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात'

नळावर पाणी भरताना, हंडाभर पाणी मिळावे म्हणून धक्‍काबुक्‍की होते, वाद वाढतात, त्‍यामुळे गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतर व्हावे, असे वाटत असल्याचे काही ग्रामस्‍थांनी सांगितले. गावातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गटारे तुडुंब भरली आहे. दैनंदिन स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे गावात हिवताप, डेंगी, मलेरियाचे आजार बळावले आहेत. गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. खारघर वसाहतीत वीज पुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती केली जाते. मात्र ग्रामस्थांना अनेक वेळा अंधारातच रात्र काढावी लागल्याचे प्रकार घडले आहेत.

"ओवे कॅम्प गावात बोअरवेलचे काम पूर्ण झाले असून पाणी पिण्यायोग्य आहे. लवकरच त्यावर मोटार बसवून पाणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न आहे."
- संजय जगताप, शहर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, पनवेल महापालिका

"ओवी कॅम्प गावात पाणी समस्या गंभीर असल्याचे समजल्यावर गावातील काही ग्रामस्थांसह सिडको अधिकाऱ्यांची भेट घेत पाणी समस्या निदर्शनास आणून दिले आहे. त्‍यानंतरही तोडगा न निघाल्‍यास मनसेच्या वतीने आंदोलन केले जाईल."
- गणेश बनकर, मनसे पदाधिकारी, खारघर

केवळ आश्‍वासनेच

कोयना प्रकल्पग्रस्त वास्‍तव्यास असलेल्या अकल्पे ओवे कॅम्प गावात जवळपास अडीचशे घरे असून लोकसंख्या तीन हजारच्या आसपास आहे. ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा आणि पनवेल पालिका अशा अनेक निवडणुका झाल्या. निवडणुकीत उभे राहणारे विविध पक्षांचे उमेदवार गावाच्या विकासासाठी आश्वासन देतात, मात्र निवडून आल्यावर कोणीही फिरकत नसल्‍याचे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे.

loading image
go to top