esakal | नवी मुंबईत डासांची भुणभुण; नागरिकांमध्ये डेंगी, मलेरियाची भीती | Malaria
sakal

बोलून बातमी शोधा

mosquito

नवी मुंबईत डासांची भुणभुण; नागरिकांमध्ये डेंगी, मलेरियाची भीती

sakal_logo
By
शुभांगी पाटील

तुर्भे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर कमी झाला असला, तरी कधी उन्हाचा तडाखा तर कधी आभाळात मळभ त्यात वातावरण बदलामुळे नवी मुंबई (Navi Mumbai) शहरात रोगराईचे (Decease) प्रमाण वाढले आहे. त्यात आता डासांनी भर घातली आहे. सायंकाळी ६ नंतर डास आक्रमक होत असल्याने (mosquitoes) फेरफटका मारायला बाहेर पडलेल्या नागरिकांना पुन्हा घरी परतावे लागत आहे. उद्यानांमध्ये सायंकाळी सहानंतर डासांची भुणभुण वाढत असल्याने पालकही मलेरिया आणि डेंगीच्या (malaria) भीतीने मुलांना घरी घेऊन जात आहेत. त्यामुळे सातच्या आधीच उद्याने रिकामी होऊ लागली आहेत.

हेही वाचा: मुंबई: वर्तमानपत्राचे महत्त्व सांगणाऱ्या वह्यांची विद्यार्थ्यांना भेट

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ला सामोरे जाताना स्वच्छतेचा संदेश जनमानसात व्यापक स्वरूपात प्रसारित व्हावा, यासाठी प्रशासन आक्रमक झाले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. अनेक योजना कागदावर तर काही योजना समाज माध्यमांवर आहेत. अजून प्रशासनाचे उपक्रम प्रसिद्धीमाध्यमाच्या रूपातून समोर यावे, यासाठी प्रशासनाची धडपड आहे. या सर्व बाबीत प्रशासन व्यस्त असल्याने नागरिक मात्र रोगराईच्या खाईत लोटला जात आहे. कोरोनाचा ताप काहीसा कमी होत नाही, तोच डोकेदुखी, अंगदुखी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यात आता डेंगी व मलेरियाने शिरकाव केला आहे. दहा दिवसांपासून शहरात मलेरिया व डेंगीची रुग्णवाढ काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, सायंकाळी सहानंतर डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचा फटका अनेकांना बसत आहेत.

हेही वाचा: एनसीबीच्या परवानगीने लॉकअपमध्ये बाप-लेकाची झाली भेट

अनेक दिवसांपासून हवामानात बदल झाल्याने रोगराईची संख्या वाढली आहे. खाडीकिनारी असणाऱ्या गावांना व सेक्टरमध्ये सध्या डासांनी चांगलेच घेरले आहे. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, जुहूगाव, वाशी व पामबीच मार्गावर फेरफटका मारण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या पूर्वीपेक्षा वाढली असली, तरी या डासांमुळे ही संख्या रोडावत चालली आहे. कोपरखैरणे परिसरात तर सध्या मोठ्या प्रमाणात डास वाढले आहेत. त्यात अनेक ठिकाणी बांधकामेही सुरू असल्याने ठिकठिकाणी पडलेल्या राडारोड्याने डासांची उत्पत्ती वाढत आहे.

उद्याने सायंकाळी सहानंतर रिकामी

काही महिन्यांपासून बंद असणारी उद्याने नुकतीच खुली करण्यात आलेली आहेत. उद्याने खुली होताच बंद खेळण्याचा आवाज पुन्हा सुरू झाला; मात्र वाढत्या डासांमुळे बच्चे कंपनीला सहा वाजले की घरी परतावे लागते. सायंकाळी सहानंतर उद्यानात डासांची संख्या हळूहळू वाढू लागते. त्यामुळे मुलांना खेळताना डासांच्या चाव्याचा त्रास सहन करावा लागतो. अनेक नागरिक आपल्या परिवारासह सायंकाळी ५ वाजता मुलांना गार्डनमध्ये घेऊन जातात. पालकांना एखाद्या ठिकाणी बसायचे म्हटले, तर त्यांनाही डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे अनेक मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. डासांच्या या समस्येमुळे सायंकाळी ६ नंतर उद्याने रिकामी होऊ लागली आहेत.


डासांच्या चाव्यामुळे अस्वस्थता

पामबीच खाडीकिनारालगत राहणाऱ्या नागरिकांनाही डासांचा जास्त त्रास होत आहे. सायंकाळी ६ नंतर या मार्गावर असलेल्या गार्डनमध्ये अथवा रात्री फेरफटका मारायला निघालेल्या नागरिकांना डासांच्या त्रासामुळे पुन्हा घरी परतावे लागत आहे. एकाच वेळी अनेक डास चावत असल्याने नागरिकांना अस्वस्थ वाटू लागते. शहरातील अन्य गार्डनमध्येही तीच परिस्थिती आहे.

"डासांची पैदास ही साठवलेल्या पाण्याच्या जागी होते. उद्यानात शक्यतो होत नाही; मात्र आजूबाजूला वाहते पाणी किंवा पाण्याची ठिकाणे असतील, तर त्या ठिकाणी डास वाढले जातात. ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, तिथे डास वाढू नयेत, यासाठी रासायनिक फवारणी केली जाते."
- डॉ. प्रमोद पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई पालिका.

"कोरोना नियमात शिथिलता मिळताच उद्याने सुरू झाली; मात्र उद्यानात आमच्या मुलांना जेमतेम सहा वाजेपर्यंतच खेळता येते. कारण सहानंतर उद्यानात खेळणे म्हणजे डासांचा हल्ला सहन करणे. त्यामुळे आम्ही सहा वाजले की, मुलांना घरी घेऊन जातो."
- सविता पाटील, नागरिक.

loading image
go to top