विमानतळाला दि बा पाटील यांचेच नाव द्यावे- रामदास आठवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामदास आठवले

विमानतळाला दि बा पाटील यांचेच नाव द्यावे- रामदास आठवले

  • भूमीपुत्रांकडून 10 जूनला करण्यात येणार मानवी साखळी आंदोलन

मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दिवंगत लोकनेते दि बा पाटील (Di Ba Patil) यांचे नाव देण्यात यावे या भूमीपुत्रांच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा (RPI) पाठिंबा असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी 10 जून रोजी भूमीपुत्रांकडून मानवी साखळी आंदोलन (Human Chain Protest) करण्यात येणार आहे. या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा देतील, असे आठवले यांनी सांगितले. (Navi Mumbai International Airport should be named as Di Ba Patil Airport says Ramdas Athawale)

माजी खासदार रायगडचे भूमिपुत्र नेते दि बा पाटील यांचे नवी मुंबईच्या उभारणीत, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात मोठे योगदान आहे. त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी जवळचा संबंध होता. त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्यांचा सहभाग होता. कोकणमध्ये शिक्षण प्रसारात दि बांचे बहुमोल योगदान आहे. नवी मुंबई रायगड या भागात त्यांनी क्रांतिकारी कार्य केले आहे. दि बा पाटील यांचे सामाजिक योगदान अनमोल असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दिले पाहिजे, ही स्थानिक भूमीपुत्रांची मागणी योग्य असून त्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा देत असल्याचे आठवले यांनी जाहीर केले आहे.

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांचीही आग्रही भूमिका

"जसा मुंबईत मराठी माणूस बाळासाहेबांमुळे टिकला.. तसाच नवी मुंबईत भूमिपुत्र दि.बा पाटील साहेबांमुळेच जगला.. कोणाच्या नावाला आमचा विरोध नाही, पण भूमिपुत्र लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे प्रकल्पग्रस्तांसाठी असलेले कार्य लक्षात घेऊनच, विमानतळाला त्यांचे नाव देण्याची आमची मागणी आहे. वर्तमानात राहून भविष्यातील पिढ्यांना आपल्या इतिहास पुरुषांचा ऐतिहासिक वारसा जपण्याची संधी देण्याची 'हीच ती योग्य वेळ' आहे. त्यामुळेच लोकनेते कै. दि. बा. पाटील साहेबांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा लोकाग्रह आहे", अशा शब्दात प्रशांत ठाकूर यांनी ट्वीटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.