ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे नवी मुंबई मेट्रोचे काम रखडले; मेट्रो रुळावर येण्यासाठी 2022 ची वाट पाहावी लागणार

गजानन चव्हाण
Tuesday, 22 September 2020

  • नवी मुंबई मेट्रोची प्रतीक्षा लांबणीवर
  • ठेकेदारांची दिरंगाई; रुळावर येण्यासाठी 2022 ची वाट पाहावी लागणार

 

खारघर :  सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बेलापूर ते खारघरगाव दरम्यानचे काम ठेकेदारांनी केलेल्या दिरंगाईमुळे लांबणीवर गेले आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे कामगार गावी गेल्यामुळे मेट्रो रुळावर येण्यासाठी 2022 ची वाट पाहावी लागणार आहे.  

कृषी सुधारणा विधेयकावरून महाविकास आघाडीत ठिणगी; शिवसेना - राष्ट्रवादीच्या भूमिकेवर कॉंग्रेसचा आक्षेप

सिडकोने मे 2011 मध्ये नवी मुंबई मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला सुरुवात केली. बेलापूर ते पेंधर हा 11 किलोमीटरचा प्रकल्प डिसेंबर 2014 मध्ये पूर्णत्वाला जाईल, असे जाहीर केले होते. पण, कंत्राटदारांच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे सात वर्षे त्याला विलंब झाला आणि रेल्वेस्थानकांच्या कामात खोडा बसला. मेट्रो मार्गावरील  रेल्वेस्थानके बांधण्याचे काम सॅनहोज, महावीर आणि सुप्रीम या कंत्राटदारांना दिले; मात्र दिलेल्या वेळेत काम झाले नाही. कामात केल्या जाणाऱ्या दिरंगाईमुळे सिडकोने कंत्राट रद्द केले. त्यामुळे या दोन्ही कंत्राटदारांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली; मात्र न्यायालयाने परवानगी नाकारली. त्यामुळे सिडकोने उर्वरित कामाची नव्याने निविदा काढून एनसीसी व प्रकाश कन्स्ट्रोव्हल या एजन्सीला काम दिले. 
सेंट्रल पार्क ते पेंधर या पाच स्थानकांचे काम योग्य प्रकारे झाले. त्यामुळे रेल्वे रूळ, सिंग्नल यंत्रणा व इतर कामे मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, बेलापूर ते खारघरगाव  दरम्यान प्रकाश कन्स्ट्रोव्हल या एजन्सीकडून समाधानकारक काम झाले नाही. त्यात मार्च महिन्यापासून टाळेबंदीमुळे काम जैसे थे स्थितीत आहे. 
सिडको अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बेलापूर ते खारघर दरम्यान काम करणाऱ्या ठेकेदाराची हकालपट्टी करून, पुन्हा नव्याने निविदा काढण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे समजले.

मुंबईत कोव्हिडची स्थिती चिंताजनक; तब्बल 33 लाख लोकं कंटेंन्मेंट झोनमध्ये; सहा महिन्यानंतर आकड्यांमध्ये घट नाही

बेलापूर ते खारघर रेल्वेस्थानकाचे काम करण्यासाठी किमान वर्ष जाणार असल्यामुळे बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सुरू होण्यासाठी 2022 ची वाट पाहावी लागणार आहे. गेल्या नऊ वर्षांत ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे मेट्रो रुळावर आली नसल्यामुळे सिडकोचे सर्वत्र नाचक्की होत आहे.

नवीन वर्षात पेंधर ते सेंट्रल पार्क मेट्रो धावणार?
मेट्रोचे 24 डब्बे हे चीनकडून सिडकोला प्राप्त झाले आहे. पेंधर ते सेंट्रल पार्क या पाच स्थानकांचे काम प्रगतिपथावर असून, ओव्हरहेड वायरसाठी लागणारे खांब, टेलिकम्युनिकेशन, सिंग्नल यंत्रणा आदी कामे बऱ्यापैकी झाली आहेत. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात उर्वरित कामे पूर्ण करून मे - जून अखेरपर्यंत पेंधर ते सेंट्रल पार्क स्थानकादरम्यान मेट्रो सुरू करण्याचा विचार सिडको करत आहे. याविषयी सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही.

फडणवीस आणि पंतप्रधानांचे आश्वासन हवेत
विधानसभा निवडणूकपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळोजा येथील मेट्रो कारशेड ते पेंधर स्थानकापर्यंत धावणाऱ्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. त्या वेळी खारघरमधील सेंट्रल पार्क शेजारील मैदानात पार पडलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकारणार असून जूनअखेरपर्यंत मेट्रो धावेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन हवेत विरल्याचे दिसून येते.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Metro work stalled due to delay of contractors