नवी मुंबईत शिवसेनेच्या गळाला भाजपचे दोन नगरसेवक; नवी मुंबई 'मविआ'ची ताकद वाढली

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

कविता आगोंडे आणि सुरेखा नरबागे यांचा राजीनामा 

नवी मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतराच्या स्पर्धेत मविआच्या गळाला भाजपचे आणखी दोन नगरसेवक लागले आहेत. भाजपच्या नेरूळमधील नगरसेविका कविता आगोंडे आणि बेलापूरच्या नगरसेविका सुरेखा नरबागे या दोघींनी आज महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कविता आगोंडे यांचे वडील चंद्रकांत आगोंडे आणि सुरेखा नरबागे यांचे पती अशोक नरबागे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 

मोठी बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर D-Mart बद्दल महत्त्वाची बातमी 

महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर नवी मुंबई शहरात भाजप आणि मविआंमध्ये पक्षांतराची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आतापर्यंत मविआला भाजपचे सात नगरसेवक फोडण्यात यश आले आहे. तुर्भेतील नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांचे तीन, नगरसेविका सलुजा सुतार आणि आता आगोंडे व नरबागे अशा दोन नगरसेवकांची मविआत भर पडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आगोंडे आणि नरबागे हे दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या संपर्कात होते. बेलापूर आणि नेरूळमधील विकासकामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र सत्ताधाऱ्यांनी बेलापूर आणि नेरूळमधील विकासकामांमध्ये आखडता हात घेतल्यामुळे अखेर प्रभागातील विकासकामांसाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती विजय चौगुले यांनी दिली. 

मोठी बातमी - 'असा' असेल होम क्वारंटाईनचा शिक्का, पाहा फोटो...

मित्रपक्षांची ताकद वाढली 

शिवसेनेत प्रवेश घेतल्यामुळे फक्त नावापुरते भाजपमध्ये न राहता अखेर दोन्ही नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा मिसाळ यांच्याकडे सोपवला. मविआत सध्या सुरू असलेल्या पक्षप्रवेशांमुळे महापालिकेतील भाजपच्या ताकदीच्या तुलनते मविआतील मित्रपक्षांची ताकद चांगलीच वाढली आहे. मविआकडून भाजपचे मुख्य नगरसेवक फोडले जात असताना भाजपकडून मात्र स्वीकृत नगरसेवक फोडून कडवी झूंज देण्याचा प्रयत्न केला जात आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai municipal corporation elections two bjp corporators resigned