भुकेल्या पोटांसाठी नवी मुंबई महापालिकेचा आधार ! रोज 40 हजार गरिबांना खमंग मेजवानी

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 1 May 2020

गरीब कामगार, त्यांच्या कुटुंबीयांसाठी गेला दीड महिना नवी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जेवणासोबत नाश्ता-पाण्याची व्यवस्था केली जात आहे. अडीअडचणीच्या काळात कामगारांना डोक्यावर छत आणि पोटाला आधार दिल्यामुळे महापालिका या कामगारांची माय झाली आहे.

नवी मुंबई : कोरोनाच्या काळात लागू असलेल्या दीड महिन्याच्या संचारबंदीमुळे हजारो गोरगरीब कामगारांवर बेरोजगारीने उपासमारीची वेळ आणली आहे. शेकडो कामगारांनी गड्या आपला गाव बरा म्हणत घरदार सोडले खरे; पण पोलिसांनी वाटा अडवल्यामुळे मध्येच अडकून पडून राहावे लागले. अशा गरीब कामगार, त्यांच्या कुटुंबीयांसाठी गेला दीड महिना नवी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जेवणासोबत नाश्ता-पाण्याची व्यवस्था केली जात आहे. अडीअडचणीच्या काळात कामगारांना डोक्यावर छत आणि पोटाला आधार दिल्यामुळे महापालिका या कामगारांची माय झाली आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर आणि आजूबाजूच्या परिसरातून पुण्यामार्गे आपल्या गावाकडे निघालेले सुमारे 250 कामगारांना महापालिकेने वाशीच्या सिडको प्रदर्शन केंद्रात राहण्याची व्यवस्था केली आहे. या कामगारांव्यतिरिक्त इतर भागांतून येणाऱ्या विविध कामगारांसाठी महापालिकेने विविध वॉर्डनिहाय 18 विभागवार केंद्रांवर निवारा केंद्रांची सोय केली आहे. शहरातील सर्व निवारा केंद्रांत सध्या 362 निराधार गरीब लोक वास्तव्यास आहेत. या सर्व नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची, नाश्ता, चहा-पाण्यासोबत रोजच्या रोज आरोग्य तपासणीची जबाबदारी गेले दीड महिने महापालिकेने समर्थपणे हाताळली आहे. शहरातील निवारा केंद्रांत राहणाऱ्या लोकांव्यतिरिक्त शहरातील झोपडपट्ट्या, रस्त्याच्या कडेला उघड्यावर राहणारे मजूर, दगडखाणींतील बेरोजगार कामगार, नाका कामगार, विस्थापित कामगार, बेघर नागरिक, निराधार अपंग व्यक्ती, दुर्लक्षित ज्येष्ठ नागरिक अशा सर्व तब्बल 40 हजार नागरिकांची जबाबदारी पालिकेने आपल्या खांद्यावर घेतली आहे.

३ मे नंतर काय ? मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह मधून सांगितलं 'असं' काही...

या नागरिकांना रोज सकाळी नाश्ता, चहा, दुपारी जेवण, संध्याकाळी पुन्हा चहा आणि रात्रीचे जेवण असे अन्नपुरवठा करण्यासाठी महापालिकेने शहरात 15 कम्युनिटी किचन सुरू केले आहेत. या कम्युनिटी किचनमध्ये बेलापूर, नेरूळ, सानपाडा, वाशी, ऐरोली येथील नामांकित 25 हॉटेल व्यवस्थापनांनी अन्न-धान्य देऊ केले आहेत. तसेच काही सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेत पालिकेच्या कम्युनिटी किचनला रोज हजारो टन अन्न-धान्याचा पुरवठा केला आहे. याखेरीज महापालिकेनेही हजारो टन धान्य स्वतःच्या सीएसआर फंडातून उभा केला आहे. पालिकेच्या कम्युनिटी किचन वगळता काही स्वयंसेवी संस्था व हॉटेल व्यवस्थापनांच्या माध्यमातून जेवणाची तयार पाकिटे करून गरिबांना वाटप केली जात आहेत. गरिबांना जेवणाचे वाटप करण्यासाठी शहरात 52 ठिकाणी पिकअप पॉईंट तयार केले आहेत. या ठिकाणी हे गरीब लोक सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून रोज वाटप केले जाते, अशी माहिती उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार यांनी दिली. 

Big News - परवानगी दिली ! विविध राज्यांमध्ये अडकलेल्यांसाठी सरकार सोडणार विशेष ट्रेन..

खमंग नाश्ता आणि जेवण
निवारा केंद्रांत आणि रस्त्यावरील बेघर नागरिकांना अन्नाचे वाटप करताना जेवणाचा दर्जा राखला जात आहे. सकाळी कांदे-पोहे, उपमा, गोड शिरा, इडली, बटाटे वडे अशा प्रकारचे रोज वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता आणि चहा बेघरांना दिला जातो. त्याव्यतिरिक्त शाकाहारी प्रकारचे जेवण रात्री आणि दुपारी दिले जाते. या निवारा केंद्रांतील नागरीकांची आरोग्य तपासणी केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal Corporation's support for hungry people