
राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? माध्यमांशी बोलणं भोवण्याची शक्यता
मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याचा अट्टाहास केल्या प्रकरणी राणा दाम्पत्याला राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. यावेळी न्यायालयाने काही अटीसुद्धा घातल्या होत्या. या अटी पाळल्या न गेल्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन देताना न्यायालयाने त्यांना माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास मज्जाव केला होता. मात्र तरीही दोघांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावरूनच शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी राणा दाम्पत्यावर न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता राणा दाम्पत्याच्या वक्तव्यांची पोलिसांकडून चौकशी होणार असून त्यात आक्षेपार्ह बाब आढळली तर त्यांचा जामीन अर्ज रद्द होऊ शकतो. शिवसेना याच प्रकरणी आता न्यायालयातही जाण्याच्या विचारात आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
काय होत्या न्यायालयाच्या अटी?
माध्यमांशी बोलण्यास मज्जाव
दोघांना प्रत्येकी ५० हजार रुपये भरावे लागणार
पुराव्याशी छेडछाड केल्यास जामीन रद्द
ज्या कारणामुळे त्यांना अटक झाली, ती कृती ते परत करू शकत नाहीत.
तपास करणारा अधिकारी जेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलवेल तेव्हा हजर राहावं लागेल. तपास अधिकाऱ्यालाही २४ तास आधी राणा दाम्पत्याला नोटीस देणं बंधनकारक आहे.