esakal | माटुंग्याची गावदेवी मरुआई | Navratri Festival
sakal

बोलून बातमी शोधा

Matunga Marubai Temple

माटुंग्याची गावदेवी मरुआई

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : माटुंग्याची पुरातन ग्रामदेवता मरुआई किंवा मरुबाई (matunga marubai temple) किमान चारशे वर्षे जुनी आहे. त्या काळी सभोवती सर्वत्र पाणी असल्याने रोगराई फार होती. तेव्हा आपल्या लेकरांचे मरणापासून रक्षण करणारी अशी ख्याती या देवीला मिळाल्याने तिला मरुआई किंवा मरुबाई असे नाव पडले. तिच्याच नावावरून या गावाला माटुंगा (matunga identification) असे ओळखले जाऊ लागले, असेही सांगितले जाते.

हेही वाचा: आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

किंग्ज सर्कल गार्डनपासून जवळच डॉन बॉस्को विद्यालयासमोर असलेल्या या देवळात मराठी, दाक्षिणात्य, मल्याळी, गुजराती असे सर्व भक्त येऊन आपापल्या प्रथांचे पालन करतात. माटुंगा येथे दाक्षिणात्य भाविक मोठ्या संख्येने असल्याने त्यांच्या कित्येक प्रथा येथे पाळल्या जातात. नवरात्रीत येथे गरबा तर होतच असे; पण खास दाक्षिणात्य पद्धतीचा पाच पायऱ्यांचा गोलूदेखील उभारला जातो. गोलूच्या या पाच पायऱ्यांवर वेगवेगळ्या देवतांच्या कित्येक मूर्ती ठेवून त्यांची पूजा केली जाते. एरवी नवरात्रीत हे गोलू दाक्षिणात्य भक्तांच्या घरातही असतात.

माटुंगा-सायन ही मुंबई बेटांची त्या काळची उत्तर-पूर्व दिशेची शीव (हद्द, सीमा) होती. त्याचमुळे या भागाला शीव या नावानेही ओळखले जाते. पिंपळाच्या झाडाखाली मिळालेल्या या स्वयंभू देवीची पूजा येथील मच्छीमार समाजाने चारशे वर्षांपासून सुरू केली. मरुबाई टेकडी गाव असे पूर्वी या गावाचे नाव होते. त्याचा अपभ्रंश होऊन गावाचे नाव माटुंगा झाले, अशी कथा आहे; तर येथे मातंग ऋषींनी आपल्या आश्रमात कठोर तप केल्याने या गावाला माटुंगा नाव मिळाले, अशीही दुसरी आख्यायिका आहे.

हेही वाचा: रावण दहनाच्या कार्यक्रमावरून आदिवासी संघटना एकमेकांच्या विरोधात

ब्रिटिशांनी मुंबईचा विकास करताना १८८० च्या सुमारास या देवीला सध्याच्या जागी आणले व तेथे टुमदार मंदिरही उभारून दिले. नंतर १९९० च्या आसपास कांचीपीठाच्या शंकराचार्यांनी येथे कुंभाभिषेक करून मोठे देऊळ बांधले; मात्र ते बांधताना पुरातन देऊळ तोडण्यात आले नाही, तर जुने देऊळ सुरक्षित ठेवून त्याभोवती पिलर-बीम उभारून त्यावर नवे देऊळ बांधण्यात आले, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अनिल गावंड यांनी दिली. शंकराचार्यांच्या सांगण्यावरून येथे चंडिका होमदेखील केला जातो.

उत्सवकाळात येथे पूजाअर्जा, नवचंडी-अष्टमी होम, गुजराती गरबा, दाक्षिणात्य भजने, केरळी संगीत असे विविध कार्यक्रम असतात. शेजारील शंकरमठाच्या ट्रस्टींच्या सहकार्याने हे कार्यक्रम होतातच; पण त्यांच्याच सहकार्याने मंदिर ट्रस्ट शंकर हिंदू मिशनसोबत कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातही काम करतो. देणग्यांमधून रुग्णांना मदत, अन्नदान अशी कामेही केली जातात.

शैक्षणिक कार्यासाठी

या देवीला शारदादेवी (सरस्वती) असेही संबोधले जाते. त्याचमुळे या देवीच्या देवळाचे स्थलांतर करताना ब्रिटिशांनी देवळाभोवतीची मोठी जागा शैक्षणिक कार्यासाठी आरक्षित केली. आज त्याच जागेवर व्हीजेटीआय, पोदार, रुईया, खालसा, एसएनडीटी, एसआयईएस, एसआयडब्ल्यूएस अशा शिक्षण संस्था उभ्या आहेत.

loading image
go to top