esakal | NCB : समीर वानखेडे यांच्यावर ठेवली जातेय पाळत? पोलिसांकडे तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede

समीर वानखेडे यांच्यावर ठेवली जातेय पाळत? पोलिसांकडे तक्रार

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. मुंबई पोलीस विभागातील अधिकारीच आपल्या हालचाली टिपत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

समीर वानखेडे आपल्या इतर अधिकाऱ्यांसह मुंबई पोलिसांच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोमवार भेटले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. त्यांनी म्हटलं की, "गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांमधील काही कर्मचारी आपल्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत" यासंदर्भातील एक सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी या पोलीस अधिकाऱ्यांना सुपूर्द केलं आहे. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱी साध्या कपड्यांमध्ये आपला पाठलाग करत असल्याचं दिसत असल्याचा दावाही त्यांनी केला. आपण नेमके कुठे जातो, कोणाला भेटतो आहोत? हे टिपत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: चीनची भारताला धमकी; युद्ध झालं तर हाराल

याशिवाय वानखेडे यांनी असंही सांगितलं की, "सन २०१५ मध्ये त्यांच्या आईचं निधन झालं होतं. तेव्हापासून ते दररोज त्यांच्या स्मृतीस्थळी जात असतात. पण या ठिकाणी देखील आपल्यावर पाळत ठेवण्यात आली आहे," असा गंभीर आरोपही त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

नवाब मलिकांनी केले होते गंभीर आरोप

आर्यन खान प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर ही कारवाई बनावट असल्याचे गंभीर आरोप केले होते. कारण एनसीबीच्या कारवाईवेळी त्या ठिकाणी भाजपचे काही नेतेही आढळून आल्याने त्यांनी ही कारवाई भाजपनेच घडवून आणल्याचा आरोप केला होता. यानंतर सातत्यानं आरोप होत राहिल्यानं आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा संशय समीर वानखेडे यांनी व्यक्त केला असून याबाबत पोलिसांत तक्रारही दिली आहे.

बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमुळं आले चर्चेत

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे झोनल डायरेक्टर असलेले समीर वानखेडे हे गेल्या दीड वर्षपासून आपल्या धडक कारवायांमुळे चर्चेत आहेत. १४ जून २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या कथीत आत्महत्येनंतर बॉलिवडूमधील ड्रग्ज अँगल चर्चेत आला होता. यावेळी सातत्यानं कारवाई करताना अनेक कलाकारांना चौकशीसाठी बोलावण्यामुळं समीर वानखेडे चर्चेत आले होते. त्यानंतर नुकत्याच मुंबई जवळ समुद्रात कॅडेलिया या क्रूझवर झालेली रेव्ह पार्टी समीर वानखेडे यांच्या टीमनं उधळून लावली होती. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान हा देखील सहभागी होता. त्याच्याकडूनही एनसीबीनं ड्रग्ज जप्त केले होते. त्यामुळं बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणानं पुन्हा एकदा उचल खाल्ली. पण ही कारवाई करणारे समीर वानखेडे हे पुन्हा चर्चेत आले.

loading image
go to top