नवी मुंबईत निष्काळजीपणा जीवावर; अत्यवस्थ स्थितीमुळे 40 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू 

सुजित गायकवाड
Monday, 12 October 2020

कोरोना संसर्ग झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, उपचार कसे करायचे, याबाबत जनजागृतीसाठी नवी मुंबई महापालिका अनेक मार्गांचा अवलंब करत आहे

नवी मुंबई : कोरोना संसर्ग झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, उपचार कसे करायचे, याबाबत जनजागृतीसाठी नवी मुंबई महापालिका अनेक मार्गांचा अवलंब करत आहे. त्यानंतरही अनेक जण गांभीर्यीने घेत नसल्याने ते मृत्यूला आमंत्रण देणारे ठरतात. महापालिकेकडे उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण अनेक दिवस हा आजार अंगावर काढतात. त्यामुळे ते उपचारासाठी उशिराने पोहोचतात. त्यातूनच मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने काढला आहे. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेले चुकीचे संदेश आणि भयगंडामुळे अनेक जण रुग्णालयात दाखल होण्यास चालढकल करतात, असेही स्पष्ट झाले आहे. 

सामान्य रुग्णांसाठी वाशी रुग्णालयाचे दार उघडले; फ्ल्यु ओपीडी सुरू, टप्प्या-टप्प्याने सुविधा वाढवणार

नवी मुंबईत कोरोनासंसर्ग सुरू झाल्यापासून (मार्च) आत्तापर्यंत शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 40 हजारांचा आकडा पार केला आहे; तर तब्बल 809 रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत असली, तरी रुग्णमृत्यूच्या दरात फारशी घट झाली नाही, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेनेही ही बाब गांभीर्याने घेत माहिती घेतली घेतली. त्या वेळी अनेक जण उपचारासाठी उशीर करतात, हे स्पष्ट झाले. या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल झालेले असतात. अशा परिस्थितीत अधिक वय, जुने आजार आणि शरीराची खालावलेली प्रकृती या तीन कारणांमुळे रुग्ण काही दिवसांमध्ये दगावण्याचे प्रकार घडतात, अशी माहिती आरोग्य विभागातील डॉक्‍टरांनी दिली. ताप-थंडी, सर्दी-खोकला, वास व चव न लागणे आदी लक्षणे जाणवल्यानंतरही बरेच रुग्ण आपल्या नजीकच्या डॉक्‍टर अथवा दुकानातून औषधे घेऊन उपचार करतात. या परिस्थितीत श्‍वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे आणि प्राणवायूची पातळी खालावते, अशा गंभीर अवस्थेत ते असतात. 

पनवेल येथील इंडिया बुल्स विलगीकरण केंद्र बंद? नवी मुंबईत उपचारावर महापालिकेचा भर 

समाजमाध्यमांवरील संदेशातून घात 
कोरोनामुळे अनेक जण घरात आहेत. त्यामुळे या फावल्या वेळेत बराच वेळ समाजमाध्यमांवर असतात. या काळात कोरोनाशी संबंधित अनेक पोस्ट प्रसारित झाल्या आहेत. त्यामध्ये रुग्णालयात अवयव काढून घेतले जातात. सुदृढ व्यक्ती रुग्णालयात गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे मृत्यू होणे, रुग्णाकडे कोणी पाहत नाही, अशा अनेक अफवा पसरवलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांत भय आहे. महापालिकेने सुरू केलेल्या कॉल सेंटरवरील तज्ज्ञांच्या ही बाब लक्षात आली आहे. त्यामुळे त्यांनी अशा रुग्णांचे प्रबोधन केले आहे. 

 

सर्वेक्षणालाही विरोध 
महापालिकेतर्फे माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जातात; परंतु त्यांना पाहिल्यानंतर अनेक नागरिक दरवाजाही उघडत नाहीत. काही जण घाबरून माहिती देत नाहीत. अजूनही अनेक जण महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर स्वतःहून जात नाहीत. 

मध्यमवयीन रुग्णांना धोका 
शहरात कोरोनामुळे आत्तापर्यंत 809 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे अधिक प्रमाण आहे. 50 ते 70 या वयोगटातील मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. या गटातील 445 लोकांचा मृत्यू झाला आहे. 
--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Negligence in Navi Mumbai Emergency conditions kill 40 percent of corona patients