शैक्षणिक वर्ष तर सुरु झाले, मात्र विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांपुढे अडचणींचाच डोंगर

संजय घारपुरे
Saturday, 8 August 2020

अनेक विद्यार्थी गावाकडे गेले आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या साधनांची त्यांच्याकडे वानवा आहे. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांच्या घरी ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण नाही.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष शुक्रवारी सुरु झाले, मात्र ते सुद्धा ऑनलाईनच. राज्याचे राजधानी असलेल्या मुंबईत सुद्धा ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ऑफलाईनच आहेत. त्यातही महत्वाची अडचण म्हणजे नेटवर्कचा प्रश्न. सध्यातरी महाविद्यालय सुरु होण्याची चिन्हे नसल्यामुळे गावी गेलेल्या विद्यार्थ्यांसमोर नेटवर्कचा प्रश्न जास्त गंभीर आहे. मुंबईत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी डेटा पॅक परवडत नसल्याची तक्रार केली असल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी प्राध्यापकांनीही ऑनलाईन शिक्षणासाठी संबंधित कॉलेजकडून पुरेसे साहित्य मिळत नाही. त्याशिवाय अन्य गोष्टींबाबत प्राध्यापकांनाच खर्च करण्यास सांगितले जात आहे.

 "जर आपण धावू शकत नाही तर आपल्या रक्ताला धावू द्या"; १५ ऑगस्ट रोजी राबवली जाणार अनोखी मोहीम

ऑनलाईन अभ्यासक्रमाबाबतचे निकष अद्यापही निश्चित झाले नाहीत. त्याचबरोबर या सर्वाचा खर्च कोण करणार हेही स्पष्ट करण्यात आले नसल्याचा आरोप मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केला आहे. मुंबई विद्यापीठाने शुक्रवारपासून ऑनलाईन अभ्यास सुरु करण्याची सूचना केली, पण काही महाविद्यालयांनी त्यापूर्वीच म्हणजे जून - जुलै महिन्यातच अभ्यासक्रम सुरु केला आहे. पण विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अल्प आहे. एका महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दोन वर्ग एकत्र केले, तरी उपस्थिती पन्नास टक्के होत नाही. विद्यार्थी तयार आहेत, पण डेटा पॅक परवडत नाही अशी तक्रार केली जात आहे. 

उल्हासनगरमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, स्फोटात सात जण होरपळले

अनेक विद्यार्थी गावाकडे गेले आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या साधनांची त्यांच्याकडे वानवा आहे. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांच्या घरी ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण नाही. अनेक शिक्षक, प्राध्यापक या प्रश्नांकडे लक्ष वेधतात, पण त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची शिक्षक संघटनेची तक्रार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयेही मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रात आहेत. या अनेक जिल्ह्यात मोबाईल नेटवर्क चांगले मिळत नाही. या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण कसे होणार अशी विचारणा करताना शिक्षक तसेच प्राध्यापकांनी मूळ प्रश्नच विचारात घेण्यात आला नसल्याची खंत व्यक्त केली. 

मुंबईकरांनो सावधान ! पुढचा आठवडाभर मुंबईत पुन्हा धुवाधार

ऑनलाईन शिकवताना उपस्थितीवर लक्ष कसे देणार, त्याशिवाय प्रतिसाद कसा मिळतो हाही प्रश्न आहे. आता शिक्षक, प्राध्यापकांनाही पू्र्ण वेतन मिळालेले नाही. या परिस्थितीत प्रत्येकजण आपल्याला शक्य होईल अशीच साधने विकत घेत आहेत. त्याचाही परिणाम होत आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new educational year starts in mumbai university, but students and teachers facing many problems