नवी मुंबईत परदेशी प्रवाशांना धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशी प्रवाशांना धोका

नवी मुंबईत परदेशी प्रवाशांना धोका

नवी मुंबई : वातावरणातील बदलत्या हंगामानुसार दरवर्षी नवी मुंबईत येणाऱ्या दूर्मिळ प्रवाशी पक्ष्यांना समाजकंटकांकडून धोका निर्माण झाला आहे. पाणथळीच्या जागा हडपण्यासाठी या पक्ष्यांचा अधिवासाच्या जागा जाळून टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उरण तालुक्यातील पाणजे पाणथळीवरील झूडुपे जाळतानाचे दृश्य काही पर्यावरणप्रेमींच्या नजरेस पडले आहेत. या संदर्भात नेट कनेक्ट फाऊंडेन आणि श्री एकविरा आई देवी प्रतिष्ठानने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

उरण तालुक्यात पाणजे येथे तब्बल २८९ हेक्टर इतकी जागा पाणथळ म्हणून घोषीत केली आहे. या जागेवर अनेक सरकारी संस्था आणि राजकीय कथित पूढाऱ्यांचा डोळा आहे. ही जागा हडपण्यासाठी या जागेवर समुद्रातून येणारे भरतीचे पाणी रोखण्यासाठी बांधावरील दरवाजे बंद ठेवण्यात येत आहेत. जणेकरून ही जागा कोरडी होऊन पाणथळीच्या व्याख्यातून बाहेर पडावी असा काही जणांचा कट आहे. या परिसरात पाहणी करताना नेट कनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी.एन कुमार आणि श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांना पाणजे पाणथळीवर काही अज्ञात लोक झूडुपांना आग लावताना नजरेस पडले.

परदेशी प्रवाशांना धोका

परदेशी प्रवाशांना धोका

या घटनेचे चित्रण कॅमेऱ्यात कैद करून सदर प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. पाणजे पाणथळीबाबत अवघ्या दहा दिवसात तीन वेळा तक्रार करावी लागत असल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी ठाकरे यांनी तात्काळ पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

एसईझेडचा भाडे करार रद्द करा

सिडकोने नवी मुंबई एसईझेडला उरण येथील दिलेल्या जागेत पाणथळीच्या जागांचा समावेश आहे. या जागांवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नसल्याने ही जागा पाणथळीच्या नियमांबाहेर व्हावी याकरीता विविध हातकंडे आजवण्यात येत आहेत. त्यामुळे सिडकोने एसईझेडसोबत केलेला करार रद्द करावा अशी मागणी नेट कनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी.एन कुमार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सरकारी आस्थापना सुस्थ

पाणजे पाणथळीच्या जागेवर याआधीही अनेकदा आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नेट कनेक्ट फाऊंडेशन आणि श्री एकविरा आई प्रतिष्ठान यांनी आगीच्या या घटनांची माहिती उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या खारफुटी संरक्षण आणि संवर्धन समितीला दिली आहे. तसेच या क्षेत्रात येणारे समुद्राच्या भरतीचे पाणी अडवण्याकरीता बांधावरील गेट बंद केले जात आहे. या प्रकरणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी हरीत न्यायाधिकरणाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हे गेट काढण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यानंतर वन विभागाने नवी मुंबई एसईझेडला नोटीस बजावली असून हा तपास अद्यापही अर्धवट ठेवण्यात आल्याने बी.एन कुमार आणि नंदकुमार पवार यांनी नाराजी व्यक्त केली.