या कामासाठी ठाणे पालिकेला मिळेणा ठेकेदार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

आरओबी उभारणाऱ्या कंत्राटदार कंपन्या तुलनेने मर्यादित असून, रेल्वे मंत्रालयाच्या परवानग्या मिळवून डेडलाईन पाळणे बंधनकारक असल्याने कंत्राटदार रेल्वेहद्दीतील कामांबाबत अनुत्सुक असल्याचे दिसतात. त्यामुळे ठाणे महापालिकेने या उन्नत मार्गिका आणि आरओबीसाठी 35 कोटींच्या पुनर्निविदा मागवल्या आहेत. 

ठाणे : ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील वाहतूक कोंडीवर महत्त्वाचा उपाय ठरणारा सॅटीस- 2 ठाणे रेल्वेस्थानक (पूर्व) परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असतानाच याचाच अंतर्भाव असलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गादरम्यानच्या उन्नत मार्गिका आणि आरओबी (रेल्वे ओव्हरब्रिज) उभारणीसाठी ठेकेदारच मिळत नसल्याचे समोर आले आहे. आरओबी उभारणाऱ्या कंत्राटदार कंपन्या तुलनेने मर्यादित असून, रेल्वे मंत्रालयाच्या परवानग्या मिळवून डेडलाईन पाळणे बंधनकारक असल्याने कंत्राटदार रेल्वेहद्दीतील कामांबाबत अनुत्सुक असल्याचे दिसतात. त्यामुळे ठाणे महापालिकेने या उन्नत मार्गिका आणि आरओबीसाठी 35 कोटींच्या पुनर्निविदा मागवल्या आहेत. 

ठाणे महापालिका, राज्य शासन आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे पश्‍चिमेकडील सॅटीसच्या धर्तीवर पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरात सॅटीस- 2 हा सुमारे 260.85 कोटींचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. बहुतांश प्रकल्प रेल्वेच्या जागेत असल्याने अनेक वर्षं पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पाचे भूमिपूजन 10 मार्च 2019 रोजी पार पडले. त्यानुसार, रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागामध्ये 7 हजार 181 चौ.मी.चे आरसीसी एलिव्हेटेड डेक बांधण्यात येणार असून त्यावर प्रवाशांच्या सुविधेसाठी बसथांबे व इतर सोई-सुविधा देण्यात येणार आहेत. ठाणे स्थानक ते पूर्वदुतगती महामार्गाशी थेट जोडण्यात येणारा 12 मीटर रुंदीचा उन्नत मार्ग; तसेच बस टर्मिनसपर्यंत 8.50 मी. रुंदीचा उन्नत मार्ग बांधण्यात येईल. तसेच स्टेशन परिसरात वाहनतळाची उभारणी करणे तसेच रिक्षा व प्रवासी वाहनांकरिता तळमजल्यावरून स्वतंत्र मार्गिका यांचा समावेश करण्यात आला असून स्टेशन बिल्डिंगदेखील उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा पूर्वेकडील एलिव्हेटेड डेक बांधण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती झाल्याने सॅटीसचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, या डेकपासून ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंतचा उन्नत रस्ता आणि आरओबीच्या कामासाठी ठेकेदार मिळेनासा झाला आहे. 

ही बातमी वाचा ः रुळ वाकल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

खर्चात वाढ होण्याची भीती 
रेल्वे हद्दीतून हा उन्नत रस्ता जात असल्याने रेल्वेच्या अडचणी आणि आरओबी उभारणाऱ्या बांधकाम कंपन्या मर्यादित असल्याने सॅटीस पूर्व- 2 च्या 35 कोटींच्या निविदेला प्रतिसादच मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मागील आठवड्यात ठाणे महापालिका प्रशासनाने पुनर्निविदा मागवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, रेल्वेच्या हद्दीमध्ये कामे करताना रेल्वेची निर्धारित डेडलाईन पाळण्यासह रेल्वेशी समन्वय साधून कामे करावी लागतात. परिणामी, अनेकदा प्रकल्पाच्या खर्चातदेखील वाढ होण्याची भीती कंत्राटदार व्यक्त करतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No contractor found for railway bridge of Satis-2