लॉकडाऊन असतानाही नवी मुंबईत का वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या नेमकी परिस्थिती...

सुजित गायकवाड
Thursday, 9 July 2020

नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 29 जूनपासून लॉकडाऊन घोषित केला. मात्र, हा लॉकडाऊन फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादीत होता.

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने जुलै महिन्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली; मात्र लॉकडाऊननंतरही शहरात कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच चालला आहे. 29 जूनपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात 9 जुलैपर्यंत तब्बल 2 हजार 318 रुग्णांची नोंद झाली आहे. याउलट अनलॉक सुरू असतानाच्या काळात 19 जून ते 28 जून दरम्यान शहरात एक हजार 815 कोरोनाचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. बेशिस्त नागरिक आणि अत्यावश्यक सेवेच्या नावाचा गैरफायदा काही व्यावसायिक घेत असल्यामुळे कोरोना वाढत असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. 

...म्हणून रॅपिड अॅंटीजन चाचणीसाठी 'त्यांना'ही परवानगी द्या; वाचा कोणी केली मागणी...

नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 29 जूनपासून लॉकडाऊन घोषित केला. मात्र, हा लॉकडाऊन फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादीत होता. परंतू परिस्थितीचे भान राखत 3 जुलै ते 13 जूलै असा दहा दिवस सर्वच भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमधून फक्त अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मात्र, या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही हॉटेल चालक, मॉल्स व्यवस्थापन, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, उपकरणे दुरूस्तीची दुकाने, गॅरेजवाले यांनी गैरफायदा घेतला. ज्या वस्तू विक्री करायच्या नाहीत, अशा वस्तू वाशी, नेरूळ आदी भागातील मॉल्स व्यवस्थापनाकडून सर्रासपणे विकल्या गेल्या. त्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पुन्हा गर्दी केल्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेली संसर्गाची साखळी खंडीत करता आली नाही. 

डोंबिवलीत कोरोना रुग्णांची परवड थांबणार; जोंधळे विद्यालयात 'इतक्या' खाटांची सुविधा...

हॉटेल चालकांना आणि किराणा माल दुकानदारांना फक्त होम डिलीव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र तयार पदार्थ आणि किराणा माल घरपोहोच करणारे कित्तेक डिलीव्हरी बॉय तोंडाला मास्क न लावताच उजळ माथ्याने फिरताना दिसत आहेत. परंतू अशा लोकांवर कारवाई करताना पोलीस दिसत नाहीत. औषधे विक्री करणाऱ्या केमिस्टच्या दूकानदारांनीही किराणा माल विक्रीसाठी ठेवला आहे. अशा दुकानांमध्ये औषधे खरेदीच्या नावाखाली काही लोक किराणा माल आणण्यासाठी गर्दी करीत आहेत. नवी मुंबईतील काही भागातच लॉकडाऊन काटेकोरपणे पाळला जात आहे. त्यामुळे अनलॉकच्या काळातील रुग्णसंख्या पेक्षा लॉकडाऊनच्या काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.    

लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम; ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट...​

मास्क न लावणाऱ्यांवर पालिकेकडून कठोर कारवाई
बेलापूर विभागात 44 हजार, नेरुळ विभागात 25 हजार 200, वाशी विभागात 25 हजार, तुर्भे विभागात 32 हजार 500, कोपरखैरणे विभागात 44 हजार 400, घणसोली विभागात 13 हजार 800,ऐरोली विभागात 18 हजार 200, दिघा विभागात 19 हजार 700 असे एकूण 2 लाख 22 हजार 800 इतकी दंडात्मक रक्कम आठ विभाग कार्यालयातून वसूल करण्यात आलेली आहे.

मोठी बातमीः बाळासाहेब थोरात यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला...

लॉकडाऊन कालावधी कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असून सर्वांच्याच आरोग्य हिताच्या दृष्टीने गरजेचा आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे व लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करुन कायदेशीर कारवाईची वेळ येऊ देऊ नये.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no of corona patients contineously increasing though there is lcokdown in navi mumbai