आर्यन खानसह तिघाजणांविरोधात पुरावा सिध्द होत नाही : उच्च न्यायालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

आर्यन खानसह तिघाजणांविरोधात पुरावा सिध्द होत नाही : उच्च न्यायालय

मुंबई : केवळ अमलीपदार्थ असलेल्या क्रुझवर प्रवास करत होते म्हणून आर्यन खानसह तिघाजणांविरोधात कटकारस्थानाचा गुन्हा दाखल करण्याइतपत पुरावा सिध्द होत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. आर्यनच्या व्हौटसप चैटमध्येही आक्षेपार्ह असे काही नाही, असे ही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.

सुपरस्टार शाहरूख खान चा मुलगा आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना उच्च न्यायालयाने अमलीपदार्थ प्रकरणात जामिन मंजूर केला आहे. यासंबंधीचे न्या नितीन सांब्रे यांनी दिलेले चौदा पानी निकालपत्र आज उपलब्ध झाले आहे. आर्यनकडे काहीही आक्षेपार्ह अमलीपदार्थ सापडले नाहीत हे स्पष्ट झाले आहे. अरबाज आणि धमेचा यांच्याकडे अल्प प्रमाणात अमलीपदार्थ सापडले असे ही यामध्ये नमूद केले आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये सापडले ४४ नवीन रुग्ण

कटकारस्थानाचा गुन्हा आरोपींंवर दाखल होण्यासाठी किमान पुरेसा सबळ पुरावा अभियोग पक्षाकडे असणे आवश्यक आहे, मात्र हा पुरावाच यामध्ये उपलब्ध नाही. कट करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक परिस्थिती आणि त्यानुसार केलेली रणनीती यामध्ये दिसत नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. या एनडिपीएस कायद्याच्या कलम 29 नुसार यामध्ये एक वर्ष कारावासाची शिक्षा असली तरी तिनही आरोपी यापूर्वीच पंचवीस दिवस कारागृहात होते, यामध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नाही, असे यामध्ये नोंदविले आहे.

कटकारस्थान आखण्यासाठी किमान आरोपीची त्यापूर्वी समान हेतूने भेट होणे आणि तशी योजना आखल्याचे पुरावे असणे आवश्यक आहे. असा पुरावा आणि भेटीचा तपशील अभियोग पक्ष दाखल करु शकला नाही. त्यामुळे या टप्प्यावर व्यावसायिक पध्दतीने अमलीपदार्थ विकण्यासाठी आरोपींवर असलेला कटकारस्थानाचा आरोप स्पष्ट होत नाही असे या निकालपत्रात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा दाखला यामध्ये देण्यात आला आहे. यानुसार आरोपींनी दिलेला जबाब गुन्हा सिध्द होण्यासाठी पुरेसा नाही, त्यामुळे तपास यंत्रणेला यासाठी पुरावे गोळा करणे आवश्यक होते, असे सांगण्यात आल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा: बदलापूर : गेम ॲपच्या नादात चिमुरडा पोहोचला गोव्यात!

मुंबईहून गोव्यात जाणाऱ्या आलिशान क्रुझवर एनसीबीने छापा घालून आर्यनसह चौदाजणांना अटक केली होती. या क्रुझवर अमलीपदार्थ आणि रेव्ह पार्टी असल्याचा आरोप एनसीबीने केला होता आणि याचे कारस्थान आर्यन आणि अरबाज, धमेचा यांनी आठल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच आर्यनच्या व्हौटसप चैटवरुन तो आंतरराष्ट्रीय तस्करांच्या संपर्कात आहे असा दावा केला आहे.

आर्यनच्या वतीने एड सतीश मानेशिंदे आणि ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी या आरोपांचे जोरदार खंडन केले. आर्यनच्या मोबाईलमधील व्हौटसप चैट आणि या प्रकरणाचा संबंध नसून हे चैट काही महिन्यांपूर्वीचे आहेत, तसेच त्याच्या कडे काहीच आक्षेपार्ह सापडले नाही, तरीही त्याला एवढे दिवस कारागृहात ठेवले, असा खुलासा करण्यात आला आहे.

loading image
go to top