सुशांतच्या बहिणींच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नाही: न्यायालय

सुनीता महामुणकर
Tuesday, 6 October 2020

वैद्यकीय तपासणी शिवाय सुशांतला बंदी घातलेले औषध बहिणी देत होत्या, अशी फिर्याद रियाने केली आहे. दरम्यान, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे मत न्यायालयाने आज व्यक्त केले.

मुंबई:  बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केलेली फौजदारी फिर्याद रद्द करण्यासाठी आता अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वैद्यकीय तपासणी शिवाय सुशांतला बंदी घातलेले औषध बहिणी देत होत्या, अशी फिर्याद रियाने केली आहे. दरम्यान, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे मत न्यायालयाने आज व्यक्त केले. उद्या रिया आणि शौविकसह पाच जणांच्या जामीनावर उच्च न्यायालय निर्णय देणार आहे.

वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांतची गर्लफ्रेंड असलेल्या रियाने त्याची बहिण प्रियंका आणि मितू सिंह विरोधात तक्रार नोंदविली आहे. रिया सध्या कारागृहात असून एनसीबी याप्रकरणी अंमलीपदार्थांचा वापराबाबत तपास करत आहे. रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून हे उघड झाले आहे की प्रियांकाने दिल्लीतील डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडून सुशांतसाठी औषधे घेतली होती. ही औषधे एनडीपीएस कायद्यानुसार प्रतिबंधित आहेत. सुशांतच्या मृत्युसाठी ही औषधे कारणीभूत ठरल्याचा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. तसेच यासाठी वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही, असेही रियाचे म्हणणे आहे.

अधिक वाचाः  मुंबई पोलिस आयुक्त बदनामी प्रकरणी सायबर सेलकडून दोन गुन्हे दाखल

या तक्रारीमध्ये प्रियांका आणि मितूविरोधात आरोप केले आहेत. त्यामुळे तक्रार रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याप्रकरणी आम्हाला नाहक गुंतविले आहे, असा दावा दोघांनी केला आहे. याचिकेवर आज न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. गुन्हा दाखल होऊन अजून एक महिना ही झालेला नाही. त्यामुळे याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. सर्व प्रतिवादींना बाजू मांडण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आणि सुनावणी १३ तारखेपर्यंत तहकूब केली.

अधिक वाचाः  धारावीकर करताहेत विजेची काटकसर, बिल कमी करण्यासाठी बेस्ट कार्यालयात गर्दी

या प्रकरणात आत्महत्या झाल्यावर ९० दिवसांनी फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदाराने प्रारंभी ट्विट करून सुशांतच्या मृत्यूबाबत माहिती नसल्यासंबंधी ट्विट केले होते, मग सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. त्यामुळे ती स्वतः याबाबत स्पष्ट मतांशी सहमत नाही, असा दावा सिंह बहिणींनी केला आहे. तसेच संबंधित औषध डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दिले होते, असेही म्हटले आहे. रियाच्यावतीने एड दिपल ठक्कर यांनी बाजू मांडण्यासाठी अवधी मागितला.

दरम्यान रिया आणि शौविकच्या न्यायालयीन कोठडीत २० तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. उद्या रिया शौविकसह पाच जणांच्या जामीन अर्जावर निर्णय घेणार आहे.  दोघांनीही एड सतीश मानेशिंदे यांच्या मार्फत जामीनासाठी अर्ज केला आहे. सुशांतचा मृत्यू आत्महत्येने झाला असून सीबीआय या प्रकरणी तपास करत आहे. आरोपी दिपेश सावंतनेही जामीनासाठी उच्च न्यायालात अर्ज केला आहे.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

No urgent hearing on Sushant's sister's petition Said Court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No urgent hearing on Sushant's sister's petition Said Court