सोमवारी आढळले ४७, मंगळवारी ५९ कोरोनाग्रस्त; मुंबईतील 147 ठिकाणे महापालिकेकडून सील

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

क्वारंटाईनसाठी खासगी इमारती, जहाजे ताब्यात घेणार

मुंबई  - मगहापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत मुंबईतील 147 ठिकाणे सील केली आहेत. होम क्वारंटाईनमधील नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी खासगी इमारती व जहाजे ताब्यात घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मंगळवारी (ता. 31) दिला. 

मुंबईत मंगळवारी कोरोनाच्या 59 नव्या रुग्णांची नोद झाली; सोमवारी 47 रुग्ण आढळले होते. 6 एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची शक्‍यता आहे. झोपडपट्ट्या व चाळींमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील व कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाही सक्तीने 14 दिवस एकांतात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. घरे लहान असलेल्या व्यक्तींना एकांतात राहणे शक्‍य नसते. अशा व्यक्तींच्या होम क्वारंटाईनसाठी खासगी इमारती व जहाजे ताब्यात घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त परदेशी यांनी प्रभागांतील सहायक आयुक्तांना दिला. त्यांना प्राथमिक सोईसुविधा पुरवण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. 

मोठी बातमी SBI मागोमाग 'या' चार बँका पुढील तीन महिने EMI घेणार नाहीत...

मुंबईत 23 मार्चला परदेशातून शेवटचे विमान आले. त्याला 6 एप्रिलला 14 दिवस होतील. त्यामुळे महापालिकेने युद्धपातळीवर मोहीम सुरू केली आहे. मागील काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या 147 वस्त्या, गृहसंकुले महापालिकेने सील केली आहेत. त्यांत वरळी कोळीवाडा, गोरेगाव येथील बिंबिसार नगर अशा मोठ्या वसाहतींचाही समावेश आहे. होम क्वारंटाईनसाठी हॉटेले, वसतिगृहे, लॉज, धर्मशाळा, मंगल कार्यालये, सभागृहे, रिकाम्या इमारती, जिमखाना, संस्था, जहाजे (क्रूझ), महाविद्यालये, क्‍लब आदी इमारती महापालिका ताब्यात घेणार आहे. 

खासगी निर्जंतुकीकरणाला मनाई 

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी कोरोनासंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला सर्व नगरसेवक, महापालिका आयुक्त व अन्य अधिकारी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. शहरात खासगी व्यक्ती-संस्थांकडून निर्जंतुकीकरण केले जात असल्याचे मुद्दा उपस्थित झाला. सोडियम हायपोक्‍लोराईटचा वापर निकषांनुसार करणे गरजेचे आहे. अतिरिक्त वापर झाल्यास अपाय होऊ शकतो. त्यामुळे खासगी संस्थांनी निर्जंतुकीकरण करू नये, असा निर्णय घेण्यात आला. 

मोठी बातमी कर्जाचा EMI भरायचा का नाही ? नागरिकांनी काय करायला हवं, वाचा स्पेशल रिपोर्ट

असे होणार निर्जंतुकीकरण 

  • कोरोना रुग्ण किंवा होम क्वारंटाईनमधील व्यक्तीच्या गृहसंकुल परिसरात आठवड्यातून एकदा. 
  • कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांत दररोज. 
  • इतर सार्वजनिक रुग्णालये, दवाखाने, हेल्थ पोस्ट, विभाग कार्यालयांचे आठवड्यातून एकदा. 

novel corona virus covid19 crisis BMC seals 147 places in mumbai 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: novel corona virus covid19 crisis BMC seals 147 places in mumbai