मुंबईकर काळजी घ्या, मुंबईतल्या 'या' भागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय

मिलिंद तांबे
Monday, 14 September 2020

गणेशोत्सवानंतर पुन्हा मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईतल्या जी उत्तरमध्ये रविवारी सुद्धा 101 नवीन रुग्णांची भर पडली असून धारावीसह दादर, माहिममध्ये देखील बाधित रूग्णांची संख्या वाढली आहे.

मुंबई : कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मात्र गणेशोत्सवानंतर पुन्हा मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईतल्या जी उत्तरमध्ये रविवारी सुद्धा 101 नवीन रुग्णांची भर पडली असून धारावीसह दादर, माहिममध्ये देखील बाधित रूग्णांची संख्या वाढली आहे. धारावीमध्ये दिवसभरात 14 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 2,915 इतकी झाली आहे. तर 140 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दादरमध्ये रविवारी दिवसभरात 28 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 2,994 इतकी झाली आहे.  465 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये 59 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 2,708 इतकी झाली. तर 477 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. धारावी,दादर,माहिम परिसराचा समावेश असणा-या जी उत्तर विभागात दिवसभरात 101 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 8,617 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 517 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 2,505, दादरमध्ये 2,427, माहीममध्ये 2,142 असे एकूण 7,074 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1,082 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक वाचाः  नवी मुंबईत साथीचे रोग आटोक्यात; डेंगीचा एकही रुग्ण नाही; नागरिकांचे प्रबोधन केल्याचा परिणाम

 

मुंबईत रूग्णवाढ दर वाढतोय, मृत्यूदर नियंत्रणात

मुंबईत रविवारी ही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला असून दिवसभरात 2,085 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,69,693 झाली आहे. रूग्णवाढीच्या दरात ही वाढ झाली असून तो 1.21 वरून 1.24 टक्क्यावर  पोहोचला आहे. मुंबईत रविवारी 41 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,147 वर पोहोचला आहे. मुंबईत काल 902 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका आहे.

हेही वाचाः  आवाजावरून कोरोना रुग्ण ओळखण्याच्या प्रयोगासाठी 100 नमूने गोळा; फक्त 30 सेकंदात चाचणी होणार

मुंबईत रविवारी नोंद झालेल्या 41 मृत्यूंपैकी 27 जणांना दीर्घकालीन आजार होते. रविवारी एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 21 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 41 रुग्णांपैकी 32 रुग्णांचे वय 60 वर्षावर होते तर 9 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते. दिवसभरात 902 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,30,918 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 56 दिवसांवर गेला आहे.  12 सप्टेंबर पर्यंत एकूण 9,15,789  कोविड चाचण्या करण्यात आल्या.  6 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दरात वाढ होऊन तो 1.24 इतका झाला आहे. 

----------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Number corona disease patients has increased Dadar Dharavi Mahim Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number corona disease patients has increased Dadar Dharavi Mahim Mumbai