esakal | नवनवीन योजनांमुळे हमालांच्या पोटावर
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

नवनवीन योजनांमुळे हमालांच्या पोटावर

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : हमाल दे धमाल, कुली, कुली नंबर १ यांसारख्या चित्रपटांतून सामान्य हमालाचे जीवन दाखविण्यात आले. हमालांना या चित्रपटातून नायकाचा दर्जा दिला. सध्या मात्र प्रत्यक्षात रेल्वेस्थानकातील हमालांना बेरोजगारीने ग्रासले आहे. रेल्वेमध्ये येणाऱ्या नवनवीन योजनांमुळे हमालांच्या पोटावर पाय आला आहे. परिणामी आता रेल्वेस्थानकातून हमालवर्ग नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

अंगात लाल शर्ट आणि डोक्यावर पांढरी टोपी असा पेहराव असलेल्या हमालांचे आयुष्य खडतर झाले आहे. एकेकाळी डोक्यावर दोन बॅगा, दोन्ही खांद्यांना दोन आणि हातात दोन बॅगा घेऊन रिक्षा, टॅक्सीच्या दिशेने किंवा स्थानकात एक्स्प्रेसच्या दिशेने हमालांची धाव असायची. मात्र हळूहळू काळ बदलत गेला. रेल्वेस्थानकात लिफ्ट, सरकते जिने उभारण्यात आले. रेल्वेने बॅग ऑन व्हील, बॅटरीची गाडी, बेस्ट ट्रॅव्हल ट्रॉली आणून हमालाच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे, अशी व्यथा हमालांनी मांडली.

हेही वाचा: रेल्वेस्थानकात फलाटावरून ट्रॅक्‍टर घसरला अन्‌.... 

सर्वांत जुना आणि विश्वासू मित्र हमाल आहे. मात्र सध्या हमालांची दिवसेंदिवस परिस्थिती हलाखीची होत चालली आहे. सरकते जिने, लिफ्ट, सब-वे यामुळे हमालांना आता काही काम उरलेच नाही. कोरोना काळापासून हमाल आर्थिक कोंडीत अडकला आहे. परिणामी आता रेल्वेने हमलांना ग्रुप डी मध्ये समाविष्ट केले पाहिजे. त्यानंतर कंत्राटी पद्धत आणावी, अशी मागणी अण्णासाहेब साहेब पाटील माथाडी कामगार युनियन आणि ऑल इंडिया रेल्वे लाल वर्दी कुली युनियनकडून करण्यात आली.

रेल्वेकडून नवनवीन योजना आणून हमालाच्या पोटावर पाय मारण्याचे काम सुरू आहे. आता एलटीटीवर विमानतळासारखी खासगी तत्त्वावर ट्रॉली सुविधा आणल्याने प्रवासीवर्ग त्याकडे वळेल. तर आता भारतीय रेल्वेमध्ये खासगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ७० स्थानके खासगी तत्त्वावर चालविण्यात येतील. त्यामुळे हमाल आता हद्दपार होणार आहे.
- उद्धव शेळके, हमाल, एलटीटी

घर खर्च, आरोग्य खर्च सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. रोजचा दिवस स्थानकात बसून दिवस जातो. हातात काहीच पैसे येत नाहीत. लांब पल्ल्यांच्या गाड्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती बिकट झाली आहे. हमालांना भारतीय रेल्वेमध्ये सामावून घेणे आवश्यक आहे.
- संतोष तळेकर, हमाल, ठाणे.

भारतीय रेल्वेमध्ये हमालांना खूप महत्त्व होते. मात्र विदेशी परंपराचे अनुकरण करण्यासाठी हमालांना रेल्वेस्थानकातून नामशेष केले जात आहे. विदेशात ज्याप्रमाणे हमाल नाही, तीच परिस्थिती भारतात लागू करण्यात येत आहे. सध्या मुंबई सेंट्रलवर काम नाही. भारतीय रेल्वेकडे, रेल्वे मंत्र्यांकडे अनेक वर्षांपासून हमालांच्या मागण्या निदर्शनास आणून मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली जात आहे. मात्र गरिबांना वाली नसल्याने कोणताच सकारात्मक प्रतिसाद अद्याप मिळाला नाही.
- अंकुश घुगे, हमाल, मुंबई सेंट्रल.

विमानतळाप्रमाणे रेल्वेस्थानकावर प्रवाशांना सुविधा पुरविण्यात येत आहेत. मात्र यामध्ये हमालवर्गाचे मरण होणार आहे. उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे रेल्वेमधील ठेकेदारी पद्धत बंद केली पाहिजे. २००८ च्या जीआरनुसार हमालांना रेल्वेत सामावून घ्यावे, ही मागणी रेल्वेमंत्री, रेल्वे मंत्रालयाने पूर्ण करावी.
- अशोक आव्हाड, सीएसएमटी

हेही वाचा: मुंबई : मुंबईत पावसाचा जोर ओसरला

दोन हजार हमाल
सध्या मुंबई विभागात हमालांची संख्या सुमारे दोन हजार आहे. यामध्ये सध्या एलटीटीला ६१ हमाल, मुंबई सेंट्रलला १५२ हमाल, सीएसएमटी येथे ९२ हमाल आहेत. ठाणे, कल्याण, वांद्रे येथे काही हमाल कार्यरत आहेत.

हमालांचा दर
१६० किलो वजनी बॅगा ट्रॉलीच्या साह्याने नेण्यासाठी १०५ रुपये, तर ५० ते ६० किलो वजनी बॅगा डोक्यावरून नेण्यासाठी ५० ते ६० रुपये दर आहे. सध्याचा हा दर २५ वर्षांनी वाढला असून ट्रॉलीसाठी ८० रुपये घेतले जात होते. मात्र काही स्थानकांवर प्रवासी देतील, त्याप्रमाणे पैसे घेतले जात आहेत, असे हमालांकडून सांगण्यात आले.

loading image
go to top