10 वाजताच्या परीक्षेची लिंक विद्यार्थ्यांना दुपारी 12 वाजेपर्यंत मिळालीच नाही, विद्यार्थ्यांकडून संताप

तेजस वाघमारे
Saturday, 26 September 2020

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका शुक्रवार ( ता.25) पासून सुरु झालेल्या एटीकेटी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थांना बसला

मुंबई :  मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका शुक्रवार ( ता.25) पासून सुरु झालेल्या एटीकेटी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थांना बसला. ऑनलाईन परीक्षा सुरु झाल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना लिंक न मिळाल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले. यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच एटीकेटीच्या परीक्षेबाबत प्राध्यापकांकडून सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करत एजन्सीवर विश्वास दाखवल्यानेच परीक्षेवेळी मोठा गोंधळ उडाल्याचा आरोप प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेल्या एटीकेटीच्या ऑनलाईन परीक्षा मुंबई विद्यापीठामार्फत शुक्रवारपासून घेण्यास सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थांना परीक्षेला मुकावे लागले. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाकडून एका खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या कंपनीकडून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी सराव प्रश्नसंच पाठवणे, विद्यार्थ्यांना हॉलतिकीट पाठवणे, त्यांना परीक्षेसाठी लिंक पाठवणे अशी जबाबदारी होती.

महत्त्वाची बातमी राऊतांचा रोखठोक सवाल; मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं काय झालं?

परंतु  सकाळी 10 वाजता असलेल्या लाईफ सायन्स परीक्षेच्या अनेक विद्यार्थ्यांना दुपारी 12 वाजेपर्यंत लिंकच मिळाली नाही. त्यामुळे पेपर कसा द्यायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला होता. यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून परीक्षा विभागाला वारंवार फोन करून विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरही मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना लिंक मिळाली त्यांचीच परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित विद्यार्थ्यांची परीक्षानंतर घेण्यात येईल, असे विद्यापीठाकडून उत्तर मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाच्या पातळीवर कोणतीही यंत्रणा तयार नाही. त्यामुळे परीक्षेबाबत शिक्षकांकडून विद्यापीठाला काही सूचना करण्याबरोबरच प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. मात्र शिक्षकांना ऑनलाईन परीक्षेबाबत विश्वासात न घेता त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. अंतिम वर्षाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका बनवणे, त्याचे नियोजन करणे यासाठी कमी वेळ असल्याने प्राध्यापक दिवसरात्र काम करत आहेत. ऑनलाईन एटीकेटी परीक्षेसाठीही विविध विभागाचे प्रमुख आणि शिक्षक गुरुवारी रात्री दोन वाजेपर्यंत तयारी करत होते. परंतु विद्यापीठाच्या मनमानी कारभारामुळे आणि एजन्सीच्या नाकरतेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मॅपिंग झाले नाही त्यामुळे त्यांना हॉलतिकीट व परीक्षेची लिंक पाठवणे विद्यापीठाला शक्य झाले नाही. त्यामुळे परीक्षा सुरु होऊन दोन तास उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांना यूजर आयडी आणि लिंक मिळू शकली नाही. परिणामी ऐन परीक्षेवेळी मोठा गोंधळ उडाला, असे सूत्रांनी सांगितले.  

महत्त्वाची बातमी : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं ट्विट का डिलीट केलं ? स्वतः अजित पवारांनी सांगितलं कारण

परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या अंतिम सत्राच्या बॅकलॉगच्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील विद्यार्थी या परीक्षांना प्रविष्ठ झाले होते. चारही विद्याशाखेअंतर्गत विविध अभ्यासक्रम आणि विषयांच्या बॅकलॉगच्या परीक्षा आज सुरळीत पार पडल्या. काही विषयांच्या सराव परीक्षा अजूनही घेतल्या जाणार आहेत. काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

online atkt exams students did not received exam link on right time students angry


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online atkt exams students did not received exam link on right time students angry