डॉक्टरांच्या ऑनलाईन सल्ल्याला रुग्णांकडून प्राधान्य, सर्वेक्षणातून माहिती समोर

भाग्यश्री भुवड
Sunday, 13 September 2020

 कोविडच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी जवळपास 70 टक्के रुग्णांनी डॉक्टरांकडून ऑनलाईन सल्ला घेण्याचे पसंत केले आहे. कोविड दरम्यान भारतात टेलीमेडिसिन सल्लामसलत वाढीच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे.

मुंबई:  कोविडच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी जवळपास 70 टक्के रुग्णांनी डॉक्टरांकडून ऑनलाईन सल्ला घेण्याचे पसंत केले आहे. कोविड दरम्यान भारतात टेलीमेडिसिन सल्लामसलत वाढीच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, या काळात औषधी सेवांचे डिजिटल अवलंबन तीन पटींनी वाढले आहे. मॅनकाइंड फार्माच्या सहकार्याने डॉ.ओ.एन.ए. हेल्थने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 60% रुग्णांनी टेलीमेडिसिन सल्ला घेऊन समाधान व्यक्त केले आणि 54% लोकांनी भविष्यातही हे सुरू ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.

या सर्वेक्षणात 250 पेक्षा जास्त शहरांतील 3000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचे सर्वेक्षण केले गेले. त्यानुसार, टेलीमेडिसिन भारतीय आरोग्य सेवेचा अविभाज्य भाग होऊ शकते असे या निकालांमधून दिसून आले आहे. कोविड दरम्यान क्लिनिकमध्ये संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी रूग्णांनी ऑनलाईन सल्ला घेण्याचे निवडले, जे तुलनात्मकदृष्ट्या अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या सोयीचे ठरले आहे.

अधिक वाचाः  मुंबईत कोरोना बाधित मनोरुग्णांसाठी वेगळी व्यवस्था नाही, मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, रूग्णांनी त्यांच्या डॉक्टरांच्या पसंतीचा टेलीमेडिसिन प्लॅटफॉर्म स्विकारला जो टेलीमेडिसिन मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केला गेला आहे. त्यानुसार, 70% रुग्णांनी डॉक्टरांकडून ऑनलाईन सल्ला घेणे पसंत केले, तर जवळपास 60% त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सल्ला घेत आहेत. सर्वेक्षणात, देशाच्या पूर्वेकडील भागात म्हणजेच बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या शहरातून टेलीमेडिसिनमध्ये वाढ झाली आहे.

अधिक वाचाः मुंबईत तापमानात 3 अंशांनी घट आजही पावसाची शक्यता; उकाड्यापासून दिलासा

मॅनकाइंड फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जुनेजा यांनी सांगितले की, इतर देशांमध्ये टेलीमेडिसिनची चांगली सुविधा आहे. पण,कोविड 19 ने आपल्या देशात टेलीमेडिसीन बाबत रूची निर्माण केली असून रूग्णांनी हे तंत्रज्ञान लवकर स्वीकारले. ही एक सोपा मार्ग असून दुर्गम भागातील रूग्णांना दर्जेदार उपचार देऊन समाधानही दिले आहे. आमच्या सर्वेक्षणात असे स्पष्ट झाले आहे की भारतातील रुग्ण टेलीमेडिसिन सोल्यूशन्सचा सक्रियपणे वापर करत आहेत आणि जे डॉक्टर ते वापरत आहेत त्यांना ही मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. डॉ. ओएनए हेल्थ हे एक समर्पित डॉक्टर केंद्रित टेलिकॉन्सलटेशन प्लॅटफॉर्म असून त्यावर 10,000 पेक्षा जास्त डॉक्टर आपले सहकार्य देत आहेत.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Online consultation of doctors preferred by patients, information from the survey front


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online consultation of doctors preferred by patients, information from the survey front